आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग अलर्टवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:30+5:302021-03-08T04:32:30+5:30
मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले ...
मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले याचे सध्या वन विभाग आकलन करत असले तरी एक हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान एकट्या ज्ञानगंगा अभयारण्यात झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा आणि मोताळा रेंजमध्ये येत असलेल्या अजिंठा पर्वत रांगा, ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव परिसरात काशीनळकुंड, बुलडाणा शहरा नजीकचा राजूर घाट, नळकुंड, दाभा, बिरसिंगपुर पळसेखड नाईक, पाडली आणि सातपुडा पर्वत रागांमधील जंगलांना ही आग लागली होती. ज्ञानगंगा अभयारण्यातील लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास दोन दिवस यंत्रणेला धावपळ करावी लागली. अंजिठा पर्वत रांगात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री अग्नीरक्षकांना मोठी कसरत करावी लागली होती.
--मेळघाटचा फायर सेल सक्रिय--
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेला फायर सेलही आता सक्रिय झाला आहे. सोबतच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाकडूनही वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट अलर्ट जात असून आग लागलेल्या ठिकाणाचा नकाशा व स्थितीचीही माहिती दिल्या जात आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या प्रतिबंधासाठी ५७ अग्नीरक्षक ब्लोअर यंत्रासह अन्य साधनसामुग्रीने सध्या सज्ज आहे. बऱ्हाणपुर डीएअेा कार्यालयाशीही समन्वय ठेवण्यात येत आहे.
--प्रतिशोधातून आगीच्या घटना--
जिल्ह्यातील जंगलांना प्रतिशोधातून आगी लावल्या जात असल्याचे प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जामोदमध्ये डिंकाच्या तस्करी प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाला बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या होता. त्यानुषंगाने सध्या वनविभाग अलर्ट आहे. आगीच्या घटना अशाच काही प्रकरणातून झाल्या असाव्यात अशी शंका अधिकारी व्यक्त करत आहेत.
वनविभागाची यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच जंगला लगतच्या गावातील शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांनी कोणती सतर्कता बाळगावी याची कल्पना देण्यात येत आहे. आग रोखण्यासाठी लोकसहभाग ही वाढविण्यावर भर देत आहोत.
(अक्षय गजभिये, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा)