वृक्षतोड रोखण्यात वन विभाग अपयशी!

By admin | Published: May 30, 2017 12:10 AM2017-05-30T00:10:15+5:302017-05-30T00:10:15+5:30

खासगी वृक्षतोड अधिनियमाचा गैरफायदा : बहुमूल्य वनसंपदा होत आहे नष्ट

Forest Department fails to prevent trees! | वृक्षतोड रोखण्यात वन विभाग अपयशी!

वृक्षतोड रोखण्यात वन विभाग अपयशी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : एकीकडे राज्य शासन संपूर्ण राज्यात ‘एकच लक्ष्य शतकोटी वृक्ष’ कार्यक्रम राबवित आहे, तर दुसरीकडे संरक्षित प्रादेशिक वने व अभयारण्यातील वारेमाप वृक्षतोड थांबविण्यास अपयशी ठरलेले वन व महसूल खाते खासगी वृक्षतोड अधिनियमांतर्गत वृक्षतोडीला सर्रास चालना देत आहेत. या अधिनियमाचा गैरवापर करून दररोज मोठ्या संख्येने वृक्षांची तोड केली जात आहे. लाकडाचा धंदा करणारे अवैध ठेकेदार, आरा गिरणी मालक, लाकूड तस्कर, वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालामाल करणाऱ्या खासगी वृक्षतोड अधिनियमात सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शतकोटी वृक्ष लागवडीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे त्यांचे काम शुभसूचक आहे. मात्र, लोणार तालुक्यात चित्र वेगळे दिसत आहे. वन व महसूल खात्याच्या सौजन्याने खासगी वृक्षतोड अधिनियमांतर्गत प्रत्येक गावात अनुसूचित व बिगर अनुसूचित अशा वृक्षांची खुलेआम तोड सुरू आहे. वनखात्याचे उपवनसंरक्षक, सहायक वनसरंक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, स्थानिक महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खासगी वृक्षतोड अधिनियम हा शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेषत: कृषी अवजारे तयार करण्यासाठी व शेतकऱ्यांना सरपणाला फाटा मिळण्यासाठी करण्यात आला. मात्र, या कायद्याच्या आडून शेतकऱ्यांऐवजी आरा गिरणीधारक, लाकूड व्यापारी, वन व महसूल अधिकारी हे गैरफायदा घेत आहेत. अनुसूचित वृक्षामध्ये चंदन, खैर, सागवान, शिसम, अशा मौल्यवान वृक्षांचा समावेश होतो. बिगर अनुसूचित वृक्षामध्ये बाभूळ, निंब अशा प्रजातीच्या आडजात वृक्षांचा समावेश होतो. लाकूड व्यापारी, तस्कर, गुत्तेदार हे शेतकऱ्यांच्या शेतावरील झाडे अतिशय नाममात्र दरात खरेदी करतात. वृक्षतोडीचे संपूर्ण प्रकरण हे गुत्तेदार व व्यापारीच संबंधित कार्यालयाला सादर करून सर्व सोपस्कार व व्यवहार करतात. यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल करण्यात येते. या सर्व प्रकारात वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक, वनसरंक्षक, महसूलचे वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ लेखापाल यांचे लागेबांधे असल्यामुळे प्रकरण रफादफा केले जाते.

पकडलेल्या वाहनावर उशिरा कारवाई
भरदिवसा वृक्षतोड करून लाकूडमाफिया त्यांची विक्री करतात. २६ मे रोजी सकाळीच ६ वाजेच्या दरम्यान सहायक वनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी लाकडांनी भरलेला एम. एच. ३२. ए. ८३९१ क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. त्यावर कारवाई झाली का? याची विचारणा केली असता सायंकाळी उशिरापर्यंत वन गुन्हा क्रमांक ६३९/९ जारी करण्यात आला. त्यांचेकडे निंब आणि बाभूळ तीन घन मीटर माल आढळला असून, शेख मोहम्मद हनीफ शेख रहीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वनपाल डी. के. फुके यांनी सांगितले.

जनतेच्या तक्रारीला केराची टोपली
बुलडाणा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, खांदेशातील अशा वैध वृक्षतोडीच्या तक्रारी वन खात्याच्या प्रधान सचिवापासून मुख्य वनसंरक्षकांपर्यंत झालेल्या आहेत. मात्र, या तक्रारी कचरा पेटीत टाकण्यात येतात. यामुळे पर्यावरण असंतुलन, ग्लोबल वार्मिंग, पर्जन्यमानातील घट, जमिनीची धूप असे दुष्परिणाम त्यामुळे वाढले आहेत.

खासगी वृक्षतोड अधिनियमाचा कसा गैरवापर होतो, त्यातून वनाधिकारी व लाकूड व्यापाऱ्यांना होत असलेला फायदा याची वन, महसूल, पोलीस , लाचलुचपत प्रतिबंधक व पर्यावरण खात्याची उच्चस्तरीय शोध व अभ्यास समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.
- गजेंद्र मापारी,
युवासेना, माजी उपजिल्हा प्रमुख.

Web Title: Forest Department fails to prevent trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.