बिबट्याच्या पिल्लासाठी वन विभागाची उपाययोजना
By admin | Published: December 11, 2015 02:32 AM2015-12-11T02:32:55+5:302015-12-11T02:32:55+5:30
मचानासह पिंजरा व स्वयंचलित कॅमेर्याद्वारे मोताळा वन विभागाच्या कर्मचा-यांचा जागता पहारा.
मोताळा (जि. बुलडाणा): शेलापूर शिवारात ८ डिसेंबर रोजी आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लास मादीने सुखरूप जंगलात घेऊन जावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मोताळा वन विभागाच्या कर्मचार्यांनी संजय होले यांच्या शेतात मचानासह पिंजरा व स्वयंचलित कॅमेर्याद्वारे जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे; मात्र बुधवारी ९ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंंत बिबट मादीचे पिल्लू जागेवरच असून, या मादीचे मात्र अद्याप दर्शन वन विभागाला झाले नाही. शेलापूर-तळणी शिवारातील संजय होले यांच्या शेतामध्ये मंगळवारच्या सकाळी कापूस वेचत असताना नवजात बिबट मादीचे पिल्लू एका महिलेच्या दृष्टीस पडले होते. घटनेची वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती पडल्यावर डीएफओ भगत, आरएफओ कोळ, पायघन, वन परिक्षेत्र अधिकारी पी. टी. कसले, वनपाल संजय राठोड, वनरक्षक नागरे, देशमुख, तवलारकर, मुंजाळकर, लवंगे, सोनुने व गणेश जाधवसह रेस्क्यू टीमच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबटच्या पिल्लास संरक्षण देऊन त्याच्या मूळ जागेवर ठेवले होते. आणि रात्र भर परिसरातील शेतकर्यांना सावधानतेचा इशारा देऊन मादीने पिल्लास सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे यासाठी जागता पहारा दिला होता. रात्रीत बिबट मादीने पिल्लाला घेऊन न जाता दुसर्या जागेवर उचलून ठेवून दिले. दुसर्या दिवशी सकाळी वन विभागाच्या पथकाला ही बाब समजली. दरम्यान, मंगळवारी पुन्हा दिवस व रात्र वन विभागाचे व रेस्कूय टीमचे कर्मचारी त्या ठिकाणी ठाण मांडून जागता पहारा देत आहेत. मादीने आपल्या पिल्लाला नैसर्गिकरीत्या सुखरूप जंगलात न्यावे यासाठी कर्मचार्यांकडून उंच मचान निर्माण करण्यात आले असून, त्या खाली पिंजरा ठेवण्यात आला आहे. तसेच स्वयंचलित कॅमेर्याद्वारे बिबट मादीचे पिल्लू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाची पाहणी सुरू आहे.