मतभेद विसरून समाजबांधवांनी एकत्र यावे : पाखरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:38+5:302021-02-11T04:36:38+5:30
चिखली : गावगाड्यातील पारंपरिक व महत्वाचे घटक असणारा तेली समाज हा देशासह राज्यात मोठा वर्ग असूनही समाजात एकजूटता नसल्याने ...
चिखली : गावगाड्यातील पारंपरिक व महत्वाचे घटक असणारा तेली समाज हा देशासह राज्यात मोठा वर्ग असूनही समाजात एकजूटता नसल्याने अद्यापही आपला समाज अनेक योजनांपासून वंचित आहे. हे कुठेतरी थांबावे व समाजाची प्रगती व्हावी यासाठी समाजबांधवांनी आपले हेवेदावे बाजूला सारून समाजासाठी एकत्र यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंंत पाखरे यांनी चिखली येथील जिल्हास्तरीय बैठकीत केले.
वर्धा येथे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक व्यवहारे, गजानन शेलार, डॉ.भूषण कर्डिले व आ. संदीप क्षीरसागर यांच्या संयुक्त सूचनेनुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन ७ फेब्रुवारी रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमेश लोखंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या चंदा हिंगे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे, दादा जम्मन व्यवहारे, सुधाकर रायमूल होते. या बैठकीत नागपूर येथे महा रॅलीचे आयोजन व रॅलीत येणारे समाज बांधवांची संख्या, ओबीसी वर्गाला न्याय मिळवून देण्याकरिता होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील विविध ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला संघटित करणे, जिल्ह्यातील, तालुक्यातील जनगणनेची माहितीसह जिल्हा आणि तालुक्यातील नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी सुषमा राऊत यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांचा वारसा तेली समाजातील प्रत्येकाने जोपासावा असे आवाहन केले. तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था समाजाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी डॉ. क्षीरसागर, जानेफळ अध्यक्ष रामदास देवडे, नगरसेवक गोपाल देवडे, राजेश केदारे, समाधान हिंगे यांनी देखील मार्गदर्शन केले. दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या सभेसाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. चिखली तालुका अध्यक्षपदी दीपाली सुरडकर, तर उपाध्यक्षपदी भारती लोखंडे यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. प्रास्ताविक युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे, संचालन संतोष रायमूल तर आभार दत्ता करवंदे यांनी मानले. बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य व महिला व पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते.