मनाविरूध्द घडणाऱ्या गोष्टी विसरणे हा यशाचा राजमार्ग - संतोष तोतरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 08:26 PM2019-11-16T20:26:47+5:302019-11-17T11:18:20+5:30
कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केलेले कर्म हीच खरी सेवा आहे. मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआप बदलते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: समाजात आणि संसारात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही गोष्टी ह्या मनाविरूध्द आणि इच्छेविरूध्द घडतात. मनाविरूध्द घडणाºया घटना तात्काळ विसरून जाणे, हाच सुखी होण्याचा आणि यशाचा राजमार्ग होय. जीवनविद्या मिशनचे संतोष तोतरे यांच्याशी यांच्याशी साधलेला संवाद...
जीवनविद्या मिशनचे कार्य कशा पद्धतीने चालतं?
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये जीवनविद्या मिशनचा प्रसार झाला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात लक्षावधी लोकांनी जीवनविद्येचा स्विकार केला असून महाराष्ट्रात जीवन विद्या मिशनच्या ६२ शाखा आहेत. तर मध्यप्रदेश आणि गोवा येथे प्रत्येकी एक शाखा आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून देशातील ७२ हजारांवर युवकांच्या मनात जीवनविद्येने आमुलाग्र बदल घडविला आहे. संत्सग मार्गाचे आधुनिक शिल्पकारच सदगुरू वामनराव पै होत.
जीवन विद्येच्या संकल्पाबद्दल काय सांगाल ?
हे जग सुखी व्हावे, हे हिंदुस्थान राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्राच्या पुढे जावे. हेच दोन प्रमुख सिध्दांत जीवन विद्येचे आहेत. प्रत्येकाच्या मनातील चैतन्य शक्ती जागृत करण्यावरही जीवन विद्येचा नेहमीच भर राहीला आहे.
निकोप आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी जीवन विद्येचे प्रयत्न काय ?
समाजातील व्यसनाधिता तसेच नैराश्य दूर करण्यासाठी जीवन विद्या मिशनचे मोठ्याप्रमाणावर महाराष्ट्र, गोवा आणि मध्यप्रदेशात कार्य सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने अंधश्रध्दा निर्मुलन, १० हजारापेक्षा जास्त युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यात आले. याशिवाय पर्यावरण जागृतीवरही जीवनविद्येचा भर आहे. खर्चिक विवाह पद्धतीला फाटा देण्यासाठी सामुहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. गरीब, कष्टकºयांना आधार देण्याचे काम जीवनविद्या मिशन गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. सदगुरू वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या सिंध्दाताभोवतीच जीवनविद्येचे तत्वज्ञान फिरते. कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेने केलेले कर्म लौकिकदृष्ट्या कितीही चांगले असले तरी ते ‘सेवा’ या सदराखाली येत नाही. सेवेची पायरीचे स्थान अतिशय मोठे असून सेवा हेच एक फळ आहे.
जीवनविद्या मिशनशी आपण कधीपासून जुळलात ?
समाजाच्या उत्कर्षासाठी झटणाºया जीवन विद्या मिशनशी आपला बालपणापासूनच संपर्क आला आहे. सदगुरू वामनराव पै यांची मुंबईत प्रवचने चालायची. लहानपणापासूनच ही ती ऐकत आलो. जीवनविद्या मिशनमुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला. वयाच्या २२ व्या वषी जीवनविद्या मिशनच्या प्रबोधनाच्या वारशाचा साक्षीदार झालो. महाराष्ट्र, गोवा आणि इतर राज्यात सदगुरू वामनराव पै यांचे विज्ञाननिष्ठ विचार पोहोचविण्यासाठी गत २५ वर्षांपासून सेवारत असल्याचा अभिमान आहे.