लोणार सरोवर विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:47 AM2021-02-27T11:47:40+5:302021-02-27T11:47:47+5:30

Lonar Crater ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समिती’ या दोन समित्यांचा समावेश आहे.

Formation of two new committees for Lonar Sarovar development | लोणार सरोवर विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन

लोणार सरोवर विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन

googlenewsNext

बुलडाणा: लोणार सरोवर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने दोन समित्यांची स्थापना केली आहे. यात अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समिती’ या दोन समित्यांचा समावेश आहे.

लोणार सरोवराचा विकास करून त्याला पर्यटनाच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्यासाठी या समित्या गठीत केल्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
लोणार सरोवर हा जागतिक वारसा संवर्धन, जतन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेल्या निरीक्षण व सूचनांनुसार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देश नुसार या समित्यांचे गठण करण्यात आले. जगविख्यात ठेवा असलेला लोणार सरोवर परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लोणार दौरा केला होता. त्यानंतर विकास निधी आणि त्यादृष्टीने नव्याने समित्यांचे गठण करण्यात आले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ फेब्रुवारी रोजीच अनुषंगीक आदेशही पारीत केला असल्याची माहिती खा. प्रतापराव जाधव यांनी दिली.

लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समितीमध्ये अमरावती विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असून बुलडाणा जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. यासोबतच प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर), मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (अमरावती), जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता (अमरावती), भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक (नागपूर), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक (अमरावती), न्यायालयीन मित्र, उपविभागीय अधिकारी व लोणार पालिकेचे मुख्याधिकारी यात सदस्य म्हणून राहतील.
यासोबतच लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिव हे काम पाहतील. या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, आराखड्याची संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, लोणार पालिकेचे मुख्याधिकारी हे सदस्य राहतील. पर्यटन विभागाचे सहसचिव सदस्य हे समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.

 विकासासाठी कटिबद्ध - जाधव 
जागतिक आकर्षण असलेल्या लोणारला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. लोणार विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत असे खा. प्रतापराव जाधव म्हणाले.

Web Title: Formation of two new committees for Lonar Sarovar development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.