कृउबासच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने उचलला अग्रीम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:05 PM2019-09-14T12:05:29+5:302019-09-14T12:06:12+5:30
माजी सभापतींनी सचिवांची स्वाक्षरी नसतानाही १ लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचलल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने अग्रीम उचलल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. कृउबासमधील अनियमिता प्रकरणी एका चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये माजी सभापतींनी सचिवांची स्वाक्षरी नसतानाही १ लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचलल्याचे उघडकीस आले आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभार आणि गैर व्यवहार प्रकरणी बुलडाणा सहकारी संस्थेच्या (पणन) विशेष लेखा परिक्षक वर्ग-२ यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीने आपला विस्तृत अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला. बाजार समितीतील अनियमिततेप्रकरणी चार मुद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष रामराव टाले यांनी बाजार समितीच्या रेकॉर्ड नुसार साडेपाच लाखाचा अग्रीम उचलला आहे. १४ मे २०१८ ते ०४ मे २०१९ या कालावधीत सभापतींनी वेळोवेळी तब्बल १२ वेळा हा अग्रीम उचलला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेकॉर्डनुसार ही रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे सदर रक्कम तीन दिवसांच्या आत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जमा करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सभापतींना केल्या आहेत. यामध्ये एक लक्ष ४० हजार रूपयांच्या अग्रीम उचल केल्याप्रकरणी गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
चौकशी अहवालात माजी सभापतींवर गंभीर आक्षेप!
यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष टाले यांनी ०६ मार्च २०१९ रोजी व्हावचर क्रमांक १६०१ नुसार एक लाख ४० हजार रुपयांचा उचल केला आहे. मात्र, अग्रीम उचल करतेवेळी अग्रीम मागणी अर्ज घेतलेला नाही. व्हावचरवर सचिवांची स्वाक्षरी देखील नाही. तसेच कोणत्या कार्यालयीन कामासाठी, कोणत्या कोर्ट केससाठी हा अग्रीम उचलण्यात आला. याबाबत अर्थबोध होत नाही. सभापती किंवा सदस्य यांना समितीच्या निधीमधून अग्रीम देण्याची तरतूद नसताना नियमबाह्य अग्रीम उचलणे, ही बाब उचित नाही. सदर अग्रीम रक्कम व्याजासह बाजार समितीमध्ये भरणा करणे आवश्यक असल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश!
बाजार समितीचे माजी सचिव संतोष टाले यांच्याकडून त्यांनी नियमबाह्य पध्दतीने रोख स्वरूपात उचल केलेली अग्रीम रक्कम एक लक्ष ४० हजार आणि त्यावरील व्याजाची वसुली कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, तसा अहवात त्वरीत सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा यांनी ३ सष्टेंबर रोजी प्रशासक तथा सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिले आहेत.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींनी नियमबाह्य पध्दतीने अग्रीमाची उचल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सचिवांच्या स्वाक्षरी शिवाय एक लाख ४० हजार रुपयांची रक्कम त्यांनी उचलली आहे. ही रक्कम व्याजासह वसूल करणेबाबत कारवाईचे आदेशीत केले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.
-डॉ. महेश चव्हाण
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा.