माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुबोध सावजी यांची औरंगाबादेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:42 PM2018-12-16T16:42:05+5:302018-12-16T16:42:45+5:30
पुढील काळातील डावपेचासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी औरंगाबाद येथे जवळपास अर्धातास चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
बुलडाणा: उत्तरेतील पाच पैकी तीन राज्यात काँग्रेसने सत्तेला गवसणी घातल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासोबतच लोकसभा, विधानसभेला सामोरे जाण्याच्या दृष्टीकोणातून काँग्रेसतंर्गत हालचाली व गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. जिल्हानिहाय बारकाईने तपशील गोळा करण्यासोबतच पक्षांतर्गत पातळीवर बदलासंदर्भात काँग्रेस सध्या सतर्क झाली आहे. त्यासंदर्भानेच बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी तथा पुढील काळातील डावपेचासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी औरंगाबाद येथे जवळपास अर्धातास चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पृथ्वीराज चव्हाण हे ‘राफेल’ मुद्दा घेऊन औरंगाबाद येथे आले होते. एमजीएमच्या रुख्मीनी सभागृहामध्ये या मुद्द्यावर त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानानंतर औरंगाबादेतील रेल्वेस्टेशन लगत असलेल्या एका खासगी हॉटेलमध्ये बुलडाण्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी बुलडाणा जिल्ह्यातील राजकारणासंदर्भात १६ डिसेंबरला दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अर्धातास त्यांनी सविस्तर चर्चा केली. मध्यंतरी ११ डिसेंबला सुबोध सावजी यांनी अकोला येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन गोपनीय चर्चा केली होती. त्या चर्चेचा तपशील सावजी यांनी उघड केला नसला तरी त्याच पद्धतीने औरंगाबाद येथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा दिल्लीतील राजकारणाचे जाणकार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निमंत्रणावरून सुबोध सावजी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचाही तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र काँग्रेसने उत्तरेतील विजयानंतर आगामी निवडणुका अधिक गांभिर्याने घेत जिल्हा निहाय तपशील गोळा करण्यास प्रारंभ केल्याचे या घडामोडीवरून समोर येत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जुन्या नव्यांच्या संगमातून सत्तेला गवसणी घालण्याचा झालेला प्रयत्न पाहता भविष्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्युव्हरचना आखण्यास काँग्रेसने प्रयत्न चालवल्याचे दिसते. आता औरंगाबादेतील या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट नसले तरी ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.