माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिकांची संवेदनशीलता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:48 PM2018-06-20T21:48:53+5:302018-06-20T21:48:53+5:30
माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसनेते मुकुल वासनिक यांच्या संवेदनशीलतेमुळे रस्ता अपघातातील एका ट्रक चालकाला वेळेवर उपचार मिळाले.
अनिल गवई
खामगाव: माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसनेते मुकुल वासनिक यांच्या संवेदनशीलतेमुळे रस्ता अपघातातील एका ट्रक चालकाला वेळेवर उपचार मिळाले. ट्रकमध्ये फसलेल्या इसमाला बाहेर काढून वासनिक यांनी आपल्या ताफ्यातील वाहनाद्वारे तात्काळ रुग्णालयात पोहोविले. माजी केंद्रीय मंत्री तथा काँगे्रस नेते मुकुल वासनिक स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी मलकापूर येथून सांत्वन भेटीसाठी खामगावकडे येत होते. तत्पूर्वी लांजूड फाट्यानजीक एका ट्रकचालकाने समोरील वाहनाला धडक दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातील ट्रक उलटला. या अपघातात इंदूर येथील चालक गोपाल हा ट्रकच्या केबीनमध्ये अडकला. त्याला मुकुल वासनिक यांनी स्वत: बाहेर काढून आपल्या ताफ्यातील वाहनाद्वारे खामगाव येथील सामान्य रूग्णालयात पाठविले. यावेळी काँग्रेसनेते रामविजय बुरूंगले, विजय गुरव, प्रतिक बुरूंगले, बबलू मालठाणे यांनी जखमी गोपाल याला सामान्य रुग्णालयात भरती केले.
वासनिक यांच्याकडून चौकशी!
अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या गोपाल याला जखमी अवस्थेत केबीनमधून बाहेर काढल्यानंतर वासनिक यांनी रामविजय बुरूंगले यांच्या वाहनाद्वारे तात्काळ सामान्य रुग्णालयात पाठविले. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर मुकुल वासनिक यांनी पुन्हा सामान्य रुग्णालयात जावून जखमी गोपाल आणि त्याच्यावरील उपचारासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रसेनजीत पाटील, रामविजय बुरूंगले, धनंजयदादा देशमुख, विजय अंभोरे आदी काँग्रेस पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.