चार आरोपींना एक वर्षाचा कारावास
By admin | Published: June 15, 2017 12:55 AM2017-06-15T00:55:05+5:302017-06-15T00:55:05+5:30
मारहाण प्रकरण : जळगाव जामोद न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : जळगाव - नांदुरा रोडवरील देव क्युलस या पेट्रोल पंपावर ३ जून २०१३ रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी आरोपी विशाल मोहन इंगळे (वय २३), शे.हुसेन शे.कासम (वय २०), सागर सुभाष दळवी (वय २०) व शे.राजीव शे.हातम (वय २०) सर्व रा. जळगाव या चार आरोपींना एक वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दोन हजार रुपये नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचा आदेश जळगाव जामोद न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी अनिल ज. फटाले यांनी १३ जून सुनावला आहे.
रमेश गजानन टाकर्डे (वय २१) रा. आसलगाव यांच्या तक्रारीवरून, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून वाद करून आरोपींनी डोक्यात लाकडी काठीने मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पळून गेले. ही घटना ३ जून २०१३ रोजी रात्री १ वाजताचे दरम्यान घडली. फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध जळगाव पोलीस स्टेशनला भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये चारही आरोपींवर गुन्हा दाखल होता.
तपास अधिकारी मनोहर कोल्हे यांनी आरोपी निष्पन्न करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.
पुराव्यावरून व सरकारी अधिवक्ता एम.एस. खरात यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून, जळगाव न्यायालयाने आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.