समृद्धी महामार्गावर २४ तासांत चार ठार; डुलकी लागली अन् जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:55 AM2023-06-05T05:55:50+5:302023-06-05T05:56:54+5:30
दहा किमीच्या पट्ट्यात २४ तासांत तीन अपघात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क । बुलढाणा:समृद्धी महामार्गावर फर्दापूर टोल नाक्यालगतच्या (ता.मेहकर) दहा किमीच्या पट्ट्यात २४ तासांत तीन अपघात झाले. यामध्ये चार जण ठार तर पाच जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दिग्रस (ता. देऊळगाव राजा) येथील तिघे, तर उत्तर प्रदेशातील एकाचा समावेश आहे.
ट्रकची धडक, तीन ठार
वाशिम येथून लग्न आटोपून येणारे तिघे लघुशंकेसाठी चॅनल क्रमांक २८३ जवळ फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले. ते वाहनात बसत असताना सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले. यामध्ये एकाचा घटनास्थळी, दोघांचा मेहकर रुग्णालयात मृत्यू झाला. यामध्ये विजय शेषराव मान्टे (४८), ओम मान्टे (२०), तुषार मान्टे (३४) यांचा समावेश आहे.
डुलकी लागली, चालक ठार
- ३ जूनच्या अपघातात ट्रकने कंटेनरला मागून धडक दिली. यामध्ये आझमगड (उत्तर प्रदेश) येथील ट्रकचालक दिनेशकुमार तिवारी यांचा कॅबिनमध्येच अडकून मृत्यू झाला. डुलकी लागल्याने हा अपघात झाला.
- आणखी एका अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने धुळ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहनातील सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात; ६ ठार
नागभीड (जि. चंद्रपूर) : नागपूरवरून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे जात असलेल्या कारला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक बसली. एका चिमुकलीसह कारमधील सहा जण ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.