भरधाव मिनीट्रकच्या अपघातात चार ठार
By सदानंद सिरसाट | Published: June 30, 2023 04:44 PM2023-06-30T16:44:09+5:302023-06-30T16:44:30+5:30
रस्ता कडेला उभे असलेल्या दोघांना चिरडले, ट्रक उलटल्याने चालक-वाहक ठार
सदानंद सिरसाट, मलकापूर (बुलढाणा) : भरधाव मिनीट्रकच्या अपघातात चार जण ठार झाले. राष्ट्रीय महामार्गावर चैतन्य बायोटेक कंपनीजवळ शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
लक्झरी बस क्रमांक एमपी-०९, एफए-८३५१ ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर टायर पंक्चर झाल्याने उभी होती. त्यामुळे त्यातील प्रवासी रस्त्यावर उभे होते. त्याच सुमारास मुंबईवरून नागपूरकडे भरधाव जाणारा मिनी ट्रक क्रमांक एमएच-१८, बिजी-०८८१ ने बसजवळ उभ्या असलेल्या दोघांना जबर धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलवर भागात आदळला. त्यात चालक व वाहक असे दोघेजण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, उपनिरीक्षक नरेंद्रसिंह ठाकूर, महामार्ग पोलिस निरीक्षक संदीप इंगळे आदींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. याप्रकरणी नदीमखान नईमखान (३४), रा.अमरोळी, सुरत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रकचालक व बसचालक अशा दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.