बुलडाण्यात नदीत बुडून चौघांचा मृत्यू; परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:35 PM2019-10-13T17:35:05+5:302019-10-13T17:39:30+5:30
चिखलीमधील सैलानीनगरजवळची घटना
चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराजवळून वाहणाऱ्या जांबुवंती नदीत पोहोण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. सय्यद रिझवान सय्यद फिरोज, शेख साजीद शेख शफीक, वासीम शाह इरफान शाह आणि शेख तौसिफ शेख रफीक यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चिखलीतील जुना गाव परिसरालगत वाहणाऱ्या जांबुवंती नदीवर पोहोण्यासाठी गेले होते. चिखली शहराच्या पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेने जांबुवंती नदी वाहते. प्राथमिक माहितीनुसार पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. नदीतील चिखलात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचेही मृतदेह बाहेर काढले.
सध्या मुलांचे मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. घटनास्थळी आणि चिखली ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी सध्या मोठी गर्दी केली आहे. चारही मुलांच्या वयाची माहिती अद्याप मिळालेली नाही. या चारही मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.