आईसह चार मुलींना एकाच चितेवर दिला अग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:16 PM2019-09-24T14:16:04+5:302019-09-24T14:16:11+5:30
पतीच्या निधनानंतर चार मुली व आपले कसे होईल, अशी चिंता उज्वला ढोके हिला सतावत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आदिवासी ग्राम माळेगाव येथील उज्वला ढोक या महिलने तिच्या चार मुलींसह केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलिस प्रशासनही गंभीर झाले असून प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पतीच्या निधनानंतर चार मुलींसह आपले भवितव्य काय? या विवंचनेतूनच या महिलेने चिमुकल्या मुलींसह आत्महत्या केली असावी, असा निष्कर्ष पोलिसांनी प्राथमिक तपासात काढला आहे.
दरम्यान, मृत महिलेच्या पतीनेही १८ आॅगस्ट २०१९ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचेही कारण अद्याप अस्पष्ट असून यासंदर्भात प्रयोग शाळेमध्ये त्याच्या शवविच्छेदनानंतर व्हीसेरा पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत महिलेच्या पतीच्या मृत्यूचेही कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मेहकर येथील रुग्णालयात पाचही मृतकांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर माळेगावमध्ये एकाच चितेवर आई व तिच्या चारही मुलींना अग्नी देण्यात आला.
सोमवारी पहाटे माळेगाव नजीक सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील तुळशीराम चोंडकर यांच्या काहीशा पडक्या विहीरीत उज्वला बबन ढोके आणि तिच्या नऊ, सात, चार आणि एक वर्षाच्या अनुक्रमे वैष्णवी, दुर्गा, आरुषी व पल्लवी यांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. रविवारी शेतात उडीद तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून या सर्व मायलेकी घरातून निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सायंकाळदरम्यान, शेतातील झोपडीत जेवणही केले होते ऐवढी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने त्यांचा सासरे आणि दिर योगेश ढोके यांनी शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर सोमवारी पहाटे त्यांचे मृतदेहच सापडले. विहीरी काठी पाचही जणींच्या चपला दिसून आल्याने तेथे पाहणी केली असता हे ह्रदयद्रावक दृष्टीने स्थानिकांना दिसले.
दरम्यान, त्यांनी सामुहिक आत्महत्याच केल्याचेच ठाणेदार दिलीप मसराम यांचे म्हणणे आहे. गावच्या पोलिस पाटील वंदना गाढवे यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ठाणेदार दिलीप मसराम, पोलिस कर्मचारी शरद बाठे, बिट जमादार गणेश देढे, पोलि कॉन्स्टेबल अमोल बोर्डे, पूजा राजपूत, शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. सोबतच या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली.
दोन महिने आधीच परतले होते गावी
उज्वला ढोके यांच्या पतीनेही १८ आॅगस्ट २०१९ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. सुळा येथील काम सोडून हे कुटूंब पुन्हा दोन महिन्या आधी गावी आले होते. त्यावेळी बबन ढोके हे काहीशे तणावाखील राहत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान नंतर त्यांनी आत्महत्या केली. मेहकर तालुक्यातीलच कळंबेश्वर नजीक असलेल्या सुळा येथील एका पोल्ट्रीफॉर्मवर ते कामाला होतो. मात्र दोन महिन्या आधीच ते गावी परत आले होते. मृत महिलेच्या पतीच्या आत्महत्येमागीलही कारण स्पष्ट झालेले नाही.
महिना भरातच संपले कुटूंब
मृत महिला उज्वलाच्या पतीने गेल्याच महिन्यात विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या केली होती. त्यानंतर अवघ्या महिनाभरात उज्वला ढोके हीने आपल्या चार मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पतीच्या निधनानंतर चार मुली व आपले कसे होईल, अशी चिंता उज्वला ढोके हिला सतावत होती. काही जणांजवळ तिने ही चिंताही बोलून दाखवली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असावी अशी चर्चा या गावात आहे.
पतीच्या निधनानंतर चार मुलींच्या व स्वत:च्या भवितव्याच्या चिंतेतून हे सामुहिक आत्महत्या झाली असावी, असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. मृत महिलेच्या पतीच्या मृत्यूचे कारण नेमके स्पष्ट होण्यासाठी प्रारंभीच प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या व्हीसेराच्या अहवालाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. पतीच्या मृत्यूमुळे आधार गेल्याने हे कृत्यू करून महिलने मुलींसह स्वत:स संपवले असावे असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. प्रकरणाच्या तापासात आम्ही आहोतच.
-डॉ. दिलीप पाटील भुजबळ,
जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा