विविध अपघातात चार ठार, नऊ जखमी

By admin | Published: April 10, 2016 01:30 AM2016-04-10T01:30:43+5:302016-04-10T01:30:43+5:30

बुलडाणा जिल्ह्यात अपघातांची मालिका.

Four killed and nine injured in various accidents | विविध अपघातात चार ठार, नऊ जखमी

विविध अपघातात चार ठार, नऊ जखमी

Next

बुलडाणा : चिखली- बुलडाणा, चिखली-मेहकर तसेच साखरखेर्डा-शेंदुर्जन रस्त्यावर झालेल्या अपघातात एकूण चार ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली.
चिखली-बुलडाणा मार्गावर दुपारी ३.३0 च्या सुमारास झालेल्या अपघातातील अँपे क्र. एम.एच.२८, आर १२६0 हा प्रवासी घेऊन चिखली येथून बुलडाणाकडे जात असताना मालगणी-हातणीच्या दरम्यान बुलडाणाकडून चिखलीकडे येणार्‍या मॅक्झिमो क्र.एम.एच.१४ डी एफ १९६३ ने समोरासमोर धडक दिली. या अपघातात अमोल दत्तात्रय दवंड रा.वाडी ब्रम्हपुरी हा ठार झाला असून, इतर जखमींमध्ये अँपेचालक विलास सखाराम काळे रा.किन्होळावाडी, शुभांगी खंडागळे, चिखली, गुलाब शेळके शिरपूर, अमोल डाखुरकर कोनड, श्रीराम सावंत, संकेत गजानन सावंत, नंदा श्रीराम सावंत सर्व रा.गांगलगाव, प्रमिला भोलाने केळवद यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणावरून प्रकृती गंभीर असल्याने काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सिद्धूसिंग राजपूत, भगवान वाळेकर व दिलीप वानखेडे यांनी दिली.
दुसरी घटना चिखली-मेहकर मार्गावर सकाळी ५ वाजता घडली. पारस येथून राख घेऊन निघालेला ट्रक क्र.एम.एच.४४/९५४४ ने चिखली-मेहकर मार्गावरील एमआयडीसीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये चालक मदन रामकिसन शिरसाठ वय ३0 वर्षे रा.तेलघना ता.अंबेजोगाई जि.बीड आणि क्लिनर भरत रामकिसन केंद्रे वय १८ रा.लेंडेवाली ता.परळी जि.बीड हे दोघे जागीच ठार झाले. सकाळी पाच वाजता झालेला हा अपघात एवढा गंभीर होता की, ज्या निंबाच्या झाडाला धडक बसली ते मुळासकट उखडल्या गेले. मृतांना बाहेर काढणे अशक्य असल्याने क्रेन आणि जेसीबीच्या साहय़ाने मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पीएसआय बी.जी.भोई, पोहेकाँ सुनील राऊत, वाहतूक शाखेचे गोविंद नेमनार यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.
तिसरी घटना साखरखेर्डा-शेंदुर्जन रोडवर बाळसमुद्र फाट्याजवळ मोटारसायकल झाडावर आदळल्याने एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी रात्रीदरम्यान घडली आहे. साखरखेर्डा येथील गोरख रावसाहेब जाधव व पिंटू रमेश धनवटे हे दोन मजूर मजुरीचे पैसे आणण्यासाठी ८ एप्रिल रोजी रात्री ८.३0 वाजता बाळसमुद्र येथे जात असताना, समोरुन एक अज्ञात वाहन भरधाव वेगात आले. त्या वाहनाच्या प्रकाशामुळे मोटारसायकल चालक गोरख रावसाहेब जाधव याला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची मोटारसायकल झाडावर जावून आदळली. त्यात गोरख जाधव (२३) हा जागीच ठार झाला, तर पिंटू रमेश धनवटे हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Four killed and nine injured in various accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.