आगीत चार दुकाने खाक; दोन कोटी रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:41 PM2020-01-06T14:41:21+5:302020-01-06T14:41:31+5:30
जानेफळ: येथील चार दुकानांना भीषण आग लागून यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार पहाटे ४ वाजे दरम्यान घडली.
जानेफळ: येथील चार दुकानांना भीषण आग लागून यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार पहाटे ४ वाजे दरम्यान घडली. यामध्ये इतर दुकानांचेही नुकसान झाले आहे.
स्थानिक बसथांब्यावर अनेक व्यवसायिकांची दुकाने आहेत. यातील नवदुर्गा बिकानेर हॉटेलमध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर श्रीपुष्प ट्रेडर्स व श्रीकृष्ण अॅग्रो सेंटर अशी तीन दुकाने भीषण आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. त्यांच्या दुकानांची टीन पत्रे व शटर शिवाय एकही वस्तू राहिलेली नाही. तसेच शेजारी दुकाने असलेल्या शेळके एजन्सी, ओम मोबाईल शॉपी, जगदंबा बिकानेर हॉटेल, पंकज ढवळे यांचे हेअर सलून, गजानन काळे यांचे कृषी केंद्र, गणेश शिंगणे यांची पानपट्टी अशा एकूण ११ दुकानांचे नुकसान झाले आहे.
महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनाम्यात या नुकसानाचा आकडा १ कोटी ९४ लाख ४३ हजार ४०० रुपये दाखविण्यात आला आहे. आगीची घटना पहाटे ४ वाजे दरम्यान औरंगाबाद येथे परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना जानेफळ येथील बसथांब्यावर सोडण्यासाठी आलेल्या पालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी त्या व्यावसायिकांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना तातडीने माहिती कळविली. तर काहींंनी स्थानिक पोलिस स्टेशनला कळविले. त्यामुळे ठाणेदार दिलीप मसराम व कर्मचारी गणेश देडे, दिलीप जाधव, समाधान आरमाळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिक व युवकांनी दुकानांचे शटर, टीनपत्रे तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मेहकर, लोणार व चिखली येथील अग्निशामक दलाला कळविण्यात आल्यानंतर मेहकर येथील नगराध्यक्ष कासम गवळी यांनी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून अर्ध्या तासात अग्निशामक यंत्र पाठविले. त्यामुळे अग्निशामक दलाच्या कमर्चाऱ्यांना मदत करीत आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आगीच्या घटनेची माहिती समजताच मंडळ अधिकारी बी. जे. अनमोल, तलाठी विजेंद्र धोंडगे, श्याम सोळंके, ग्राम विकास अधिकारी दीपक तांबारे, सरपंच विश्वनाथ हिवराळे, उपसरपंच गणेश पाखरे, सैय्यद महेबुब, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा हावरे, अमर राऊत, गणेश सवडतकर, श्रीकृष्ण काकडे व गजानन कृपाळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास सहकार्य केले.