चौदा गावे गुढय़ा उभारणार नाहीत!
By admin | Published: April 6, 2016 12:18 AM2016-04-06T00:18:57+5:302016-04-06T00:18:57+5:30
उपोषणाचा दुसरा दिवस; डावा कालवा संघर्ष समितीची आक्रमक भूमिका.
देऊळगावराजा (बुलडाणा) : तालुक्यातील खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळण्यासाठीचा खडकपूर्णा डावा कालवा संघर्ष समितीचे ४ एप्रिलपासून सुरू झालेले उपोषण आज ५ एप्रिल रोजी अंढेरा फाटा येथे दुसर्या दिवशी सुरूच होते. पाणी समस्या सुटली नाही, तर परिसरातील १४ गावांमध्ये एकही घरात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाणार नाही, या सणाच्या दिवशी या गावातील एकाही घरात चूल पेटणार नाही, तसेच कुटुंबासह व गुराढोरांसह सर्व गाव उपोषणस्थळी गोळा व्हावे, अशी आक्रमक भूमिका आज संघर्ष समितीच्यावतीने विशद करण्यात आली. यावेळी उपोषणास कार्यकारी अभियंता शिवणे यांनी भेट देऊन संघर्ष समितीशी चर्चा केली, तसेच उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली; पण संपूर्ण या प्रश्नांवर मंत्रालयीन स्तरावरून तसेच प्रशासकीय अधिकार्यांकडून लेखी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे समितीने सांगितले. यावेळी समितीचे भगवान मुंडे, भगवान नागरे, कचरु भारस्कर, सुनील जायभाये, भिकाजी तळेकर, ललकाका देशमुख, सुभाष डोईफाडे, रावसाहेब तळेकर, सुधाकर मान्टे, डॉ.शिवाजी खरात, आबाराव मुरकुटे, जाधव, शिंगणे, गजानन सानप, विजय नागरे, सुरेश गीते आदी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी देत उपोषणास पाठिंबा दर्शविला.