आॅनलाइन नोंदणीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक; शिवसंग्रामची उपनिबंधकांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 03:28 PM2018-07-11T15:28:02+5:302018-07-11T15:29:18+5:30
देऊळगाव राजा: तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेने नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी आॅनलाइन नोंदणीमध्ये १६०० शेतकऱ्यांची फसवणूक करुन गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे व जाहिर खान यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. नाफेड अंतर्गत शेतकºयांच्या हरभरा व तुरीची शासनाने हमी भावाने खरेदी केली आहे. नाफेडला हमी भावाने शेतकऱ्यांना हरभरा व तूर विकण्यासाठी अगोदर शासनाकडे आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यासाठी शासनाकडे आॅनलाइन नोंदणी पाच मार्चपासून सुरु करण्यात आली होती. त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंदणी खरेदी-विक्री सहकारी संस्थेकडे आॅनलाइन केली आहे, त्याच शेतकऱ्यांना मॅसेजद्वारे कळवून हरभरा विक्रीस आणण्यास सांगितल्या गेले व त्यांचाच हरभरा घेतल्या गेला आहे. देऊळगावराजा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेकडे तालुक्यातील १७८१ शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आत नोंदणीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे जमा करुन रितसर पावती घेतली. मात्र खरेदी-विक्री संस्थेचे व्यवस्थापक योगेश गायकवाड यांनी फक्त निवडक १८१ शेतकऱ्यां चीच आॅनलाइन नोंदणी केली. जवळपास १६०० शेतकऱ्यांची शासनाकडे आॅनलाइन नोंदणी झाली नसल्यामुळे ते आपला हरभरा हमी भावाने विकू शकले नाही. परिणामी या १६०० शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे विहित मुदतीच्या आत दिल्यानंतर त्यांची नोंदणी तत्काळ करणे आवश्यक होते. ही जबाबदारी खरेदी-विक्री संस्थेची होती. मात्र व्यवस्थापक गायकवाड यांनी आॅनलाइन नोंदणीमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे १६०० शेतकरीे शासनाच्या हमीभाव योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाही करण्यात यावी व राहिलेल्या शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करुन त्यांचा हरभरा खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने केली. यावेळी तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जहीरखान पठाण, शंकर शिंदे, अनीस खान यांची उपस्थिती होती. ( तालुका प्रतिनिधी )