‘रिदास’कडून ७० लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:28 AM2020-11-13T11:28:56+5:302020-11-13T11:29:04+5:30
Buldhana Crime News गुंतवणूकदारांची ७० लाखाहून अधिक रुपयांनी फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जादा परताव्याचे आमिष दाखवून बंगळुरू येतील रिदास कंपनीच्या मालक तथा व्यवस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ७० लाखाहून अधिक रुपयांनी फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. दरम्यान गेल्या एक वर्षापासून कंपनीचा मालक व त्यांचे सहकारी फरार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
बुलडाणा शहरातील टीपू सुलतान चौकात राहणारे मोहम्मद साजीद अब्दुल हसन देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांनी बंगळुरूच्या रिदास कंपनीत ११.५० लाख रुपये जादा परताव्याच्या अनुषंगाने गुंतवले होते. त्यानंतर याच परिसरातील आणखी काही जणांनी जवळपास १६ लाख गुंतवल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र कंपनीचे मालक तथा संचालक मोहम्मद अय्युब हुसैन व मोहम्मद अनिस आयमन त्यांना दाद देत नसल्याने संबंधितांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात २७ आणि २८ ऑक्टोबर २०२० रोजी तक्रार दिली होती. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
तपासात संबंधीत कंपनीचे मालक, संचालक हे जवळपास एक वर्षापासून फरार असल्याचे समोर आले. सोबतच मुंबई, अैारंगाबाद येथेही एक वर्षापूर्वी प्रकरणात गुन्हे दाखल झालेले असल्याचे समोर आले होते. बुलडाणा शहरातील दोन जणांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर अनेक जणांना असेच जादा परताव्याचे अमिष दाखवून रिदास कंपनीच्या मालक व संचालकांनी कंपनीत पैसे गुंतवून घेतले होते. मात्र ना परतावा मिळाला ना मुळ रक्कम परत मिळाली. त्यामुळे बुलाडणा शहरासह नजीकच्या भागातील अनेकांनी पोलिसात धाव घेवून तक्रार देण्यास प्रारंभ केला आहे. शहर पोलिस संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करून संबंधीत प्रकरणे एकत्रीत करत आहेत.