अॅक्सिस बँकेविरोधात फसवणूकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:06 PM2019-09-30T14:06:15+5:302019-09-30T14:06:20+5:30
शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
बुलडाणा : अॅक्सिस बँकेने विना परवानगी खात्यातून परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
बुलडाणा येथील वसीम शेख यांचे येथीलच अॅक्सीस बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. दरम्यान १३ सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्रांच्या म्हणण्यावरून त्यांच्या औरंगाबाद येथील कोटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरिता ७ हजार रुपये पाठविले. मात्र त्यांच्या मित्राच्या खात्यात ७ हजार रुपये जमा झाले नाही. परंतू वसिम शेख यांच्या खात्यातून ७ हजार रुपये कापल्या गेले. याबाबत माहिती विचारण्यासाठी अॅक्सिस बँकेत गेल्यानंतर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांच्याशीच संपर्क करा असे सांगण्यात आले. गुगल पे कस्टमर केअरला सांगितल्या नंतर अकाउंटमधून कपात झालेले ७ हजार रुपये २१ सप्टेंबर रोजी खात्यत परत जमा झाले. परंतू २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री गुगल एग्रोमार्ट नावाने बँकेचा ओटीपी नंबर न येता परस्पर ३ हजार २५० रुपये खात्यातून कापल्या गेले. याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून कळल्यानंतर खातेदाराने २५ सप्टेंबर रोजी अक्सिस बँकेत जाऊन बँक अधिकारी किशोर धुर्वे यांना विचारपूस केली. त्यावेळी अकाउंट हॅक झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅनलाइन पद्धतीने पैसे कापल्या गेले असून एटीएमचा पिन नंबर बदलण्याचा सल्ला त्यांनी दिला. याप्रकरणी अॅक्सिस बँकेने विना परवानगी परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यावरून शहर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी बुलडाणा अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहेत.