पिकअप वाहनाचा विचित्र अपघात, पती-पत्नी ठार; देऊळगाव राजा बायपासवरील घटना
By निलेश जोशी | Published: March 18, 2023 07:03 PM2023-03-18T19:03:30+5:302023-03-18T19:04:56+5:30
ही घटना १७ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
देऊळगाव राजा : येथील बायपासवर पिकअप वाहनाला विचित्र अपघात होऊन देऊळगाव राजा तालुक्यातील जळ पिंपळगाव येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना १७ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
देऊळगाव राजा तालुक्यातील जळ पिंपळगाव येथील काकड परिवार पिकअप वाहनाने जालना येथून त्यांच्या मूळ गावी जात होता. दरम्यान, देऊळगाव राजा शहरात दाखल झाल्यावर बायपासवरून वळताना लगतच्या एका हॉटेलसमोर पिकअपची ट्रॉली घसरून मागे पडली तर वाहनाचा समोरील भाग पुढे जाऊन उलटला. या विचित्र अपघातामध्ये मागे ट्रॉलीमध्ये बसलेल्या कासाबाई भगवान काकड (४०) व त्यांचे पती भगवान भानुदासन काकड (५०) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, कासाबाई काकड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर जखमी भगवान काकड यांना जालना येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.
मृत पती-पत्नी हे पिकअपच्या मागील ट्रॉलीमध्ये बसले होते तर त्यांचा मुलगा समाधान हा चालकाच्या बाजूला समोर बसला होता. या विचित्र अपघाताबद्दल पोलिसांना माहिती मिळताच एपीआय डी. एम. वाघमारे पोलिस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले. यावेळी जखमी दाम्पत्याला त्यांचा मुलगा समाधान काकड याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. मात्र, नंतर दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल देवीचंद चव्हाण यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी प्रारंभिक तपासाच्या आधारावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलिस ठाण्यातील विनोद गवई हे करत आहेत.
वर्षभरातील पाचवा अपघात -
देऊळगाव राजा येथील बायपासलगत झालेला हा वर्षभरातील पाचवा अपघात आहे. यापूर्वीच्या अपघातामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले होते. दोघांना प्राण गमवावे लागले होते, असे स्थानिकांनी सांगितले.