बुलडाणा जिल्ह्यातील १३३४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:27 PM2018-03-14T18:27:13+5:302018-03-14T18:27:13+5:30
बुलडाणा : आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २२० शाळांपैकी १४५ शाळांसाठी शाळेपासून एक कि़मी. अंतरावरील विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीमध्ये ड्रॉ काढण्यात आला.
बुलडाणा : आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २२० शाळांपैकी १४५ शाळांसाठी शाळेपासून एक कि़मी. अंतरावरील विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीमध्ये ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ३३४ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, ११ दिवसात संबंधीत शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. २४ मार्चपर्यंत प्रवेश न घेतल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता पहिल्या वर्गात मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून देण्यात आले आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यात २२० शाळांमध्ये २ हजार ९९३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी पालकांकडून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हाभरातून ३ हजार ३३६ अर्ज प्रविष्ठ झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी बुलडाणा येथील शारदा ज्ञानपीठमध्ये १३ मार्चला पहिली सोडत (लॉटरी) काढण्यात आली. शाळेपासून विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापर्यंतचे १ कि.मी. अंतर असलेल्यांना यात प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे पहिल्या टप्प्यात शाळेपासून १ कि.मी. अंतरापर्यंतच्या या अटीत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची सोडत (लॉटरी) काढण्यात आली. त्यामध्ये आरटीई अंतर्गत येत असलेल्या २२० शाळांपैकी १४३ शाळांसाठी हा ड्रॉ काढण्यात आला. आरटीईच्या या सोडत पद्धतीमुळे जिल्ह्यातील १ हजार ३३४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकांना २४ मार्चपर्यंत आपल्या पाल्याचा संबंधीत शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. मात्र ११ दिवसाच्या या मुदतीत प्रवेश घेतला नाही तर सदर प्रवेश रद्द होणार असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानंतर २८ व ३१ मार्च या चार दिवसाच्या कालावधीत पुन्हा दुसरी सोडत (लॉटरी) काढून २ ते १२ एप्रिल या कालावधीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.
यांच्या उपस्थितीत झाला ड्रॉ
आरटीई अंतर्गत अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांचा बुलडाणा येथील शारदा ज्ञानपीठमध्ये पहिला ड्रॉ काढण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी सुभाष वराडे, सर्व शिक्षा अभियानचे नितिन आरज, मुख्यध्यापक ्रप्रतिनिधी म्हणून शेख बसीद अब्दूल हमीद, शारदा ज्ञानपीठचे ग्रंथपाल कृष्णा शेळके, पालक प्रतिनिधी रुपराव चव्हाण व पालकांची उपस्थिती होती.
लकी ड्रॉमध्ये निवड झालेल्या मुलांना मिळालेल्या शाळेतच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. २४ मार्चपर्यंत प्रवेश न घेतल्यास या प्रक्रियेतून अशा मुलांची नावे बाद होतील.
- एस.टी.वराडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.