बुलडाणा जिल्ह्यात मोफत डाळ वितरण रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 06:24 PM2020-05-13T18:24:01+5:302020-05-13T18:24:08+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात चना, तूर डाळ शिल्लक नाही.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत माहे एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत प्रतिमहिना प्रती कार्ड १ किलो चना अथवा तूर दाळ मोफत वितरीत केल्या जाणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात चना, तूर डाळ शिल्लक नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मोफत डाळ वितरण रखडल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर संबंधित कार्ड धारकाला १ किलो चणा अथवा तूरदाळ मोफत देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला प्रती माह १६ हजार मेट्रीक टन चनाडाळ व तूरदाळ उपलब्ध करून देण्यात आली. राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांना चणा, तूर डाळीचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात तूर, चना डाळ उपलब्ध नाही. त्यामुळे गत दोन महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्यांला डाळीचे वितरण करण्यात आले नाही. परिणामी, जिल्ह्यात डाळीचे वितरण रखडल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांत प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे तांदुळासोबत प्रति कार्ड १ किलो तूर, चना डाळ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानदाराला डाळीचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे डाळीचे वाटप रखडले आहे.
- राजेश अंबुसकर
जिल्हाध्यक्ष,
बुलडाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, संघटना.