नांदु-यामध्ये नि:शुल्क आरोग्य सेवेस प्रारंभ!
By admin | Published: February 15, 2016 02:24 AM2016-02-15T02:24:59+5:302016-02-15T02:24:59+5:30
सामाजिक बांधीलकीतून श्री सत्यसाई सेवा संघटनेचा नांदुरा शहरात उपक्रम सुरू.
नांदुरा: तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकाला नि:शुल्क उपचार उपलब्ध करून देण्यासाठी श्री सत्यसाई सेवा संघटनेने शहरातील जिजामाता चौक येथे साप्ताहिक नि:शुल्क दवाखाना व ज्या तालुक्यातील गावामध्ये डॉक्टर नाहीत त्या गावांसाठी मेडीकल व्हॅनच्या माध्यमातून रुग्णसेवेला १२ फेब्रुवारीपासून प्रारंभ केला आहे. तालुक्यातील श्री सत्यसाई सेवा संघटनेने शहरातील जिजामाता चौकात सत्यसाई बाबा मंदिरात साप्ताहिक नि:शुल्क दवाखान्याचा प्रारंभ केला. या दवाखान्यांतर्गत डॉ. वसंत पाटील, डॉ. पूजा प्रकाश चवरे, डॉ. स्नेहलता वानखडे, डॉ. प्रिया शंकर वानखडे, डॉ. गजानन अमलकार आदींनी उपस्थित राहून रुग्णसेवा देत आहेत. या दवाखान्याच्या शुभारंभप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष राजेश एकडे, केशव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी सायर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. लक्ष्मीनारायण जैस्वाल, वसाडीचे सरपंच बळीराम गिर्हे, समता अर्बनचे अध्यक्ष अजय घनोकार, काळवीट, पी.जी. तायडे, वडोदे, टी.एम. जोशी सर, के.के.कोल्हे, वासुदेव सूर्यवंशी, धनंजय हजारे, कैलास भिसे, देवराव वराडे, गोकुल घोगले आदींची प्रमुख उपस्थिती होती. नि:शुल्क रुग्णालयाच्या प्रारंभ दिनी सुमारे एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना नि:शुल्क औषधीचे वितरण करण्यात आले. औषध वितरणासाठी गोपेश तापडिया व वासुदेव सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. यापुढे प्रत्येक गुरुवारी या उ पक्रमांतर्गत नि:शुल्क रुग्ण तपासणी औषधांचे वितरण केल्या जाणार आहे. तालुक्यातील ज्या गावामध्ये डॉक्टरांची सेवा उपलब्ध नाही अशा गावामध्ये नि:शुल्क रुग्णसेवा व औषधीचे वितरण करण्यासाठी श्री सत्यसाई संघटनेने मेडीकल व्हॅनच्या माध्यमातून रुग्णसेवेला प्रारंभ केला आहे.