ब्राम्हंदा शिवारात मादी बिबट्याचा पिलांसह मुक्त संचार,शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
By निलेश जोशी | Published: March 22, 2024 08:41 PM2024-03-22T20:41:52+5:302024-03-22T20:44:17+5:30
Buldhana News: ब्राम्हंदा शिवारातील एका शेतात मादी बिबट्यासह तीन पिलांचा मुक्त संचार २१ मार्च रोजी दिसून आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. यावेळी वनविभागाचे पथक आणी बचावर पथकाला पाचारण करीत सीसीटीव्ही कॅमेरे लावून पिंजरे लावण्यात आले होते.
- नीलेश जोशी
मोताळा - ब्राम्हंदा शिवारातील एका शेतात मादी बिबट्यासह तीन पिलांचा मुक्त संचार २१ मार्च रोजी दिसून आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. यावेळी वनविभागाचे पथक आणी बचावर पथकाला पाचारण करीत सीसीटीव्ही कॅमेरे लावून पिंजरे लावण्यात आले होते. दरम्यान सदर मादी बिबट्या पिलांसह खांडवा शिवारात निघून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले असून पुढे जंगलात निघून गेले असल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.
तालुक्यातील ब्राम्हंदा शिवारात धामणगाव बढे येथील शेतकरी सतीश बढे यांची शेती असून २१ मार्च रोजी त्यांच्या शेतात शेतमजूर काम करीत असतांना त्यांना दुपारी एका झुडुपात बिबट्याची तीन पिल्ले दिसून आली. यावेळी मजुरांची एकच धांदल उडाली होती. दरम्यान शेतमजुरांनी शेतमालक सतीश बढे यांना माहिती दिली आणी सतीश बढे यांनी तात्काळ वनविभागाला कळविले. वनपाल एस. एच. जगताप, वनरक्षक एस. एस. कुलट, एस. एस. तायडे, विनोद ससाणे, वैभव फुंड हे वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी त्यांना बिबट्याची पिल्ले दिसली त्यामुळे वनविभागाच्या वतीने तात्काळ बुलढाणा येथील रेस्क्यू टिमला घटनास्थळी पाचारण केले. याची माहिती परिसरात पसरल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी मादी बिबट्या नागरिकांवर हल्ला करू शकते. या भीतीमुळे वनविभागाच्या पथकाने जमलेल्या नागरिकांना घटनास्थळा पासून दूर अंतरावर तसेच सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आणी परिसरात रेस्क्यू टिमच्या सहकार्याने पिंजरा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. दरम्यान रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मादी बिबट्या त्याच्या पिलांना घेऊन खांडवा परिसरात निघून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. मादी बिबट आणी त्याची पिल्ले खांडवाच्या पुढे जंगलात निघून जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही वनविभागाचे पथक घटनास्थळी ठाण मांडून आहे. या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अनुपस्थित
ब्राम्हंदा शिवारात मादी बिबट्यासह तीन पिल्लांचे दर्शन शेतकऱ्यांना झाल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. परंतू वनपरिक्षेत्र अधिकारी मात्र घटनास्थली आले नाहीत. परिसरात सागवनाच्या लाकडांची तस्करी होत असल्याचे वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईतच स्पष्ट झाले आहे. त्या उपरही वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांचे या भागात दुर्लक्ष होत आहे. ब्राम्हंदा शिवारातील या घटनेप्रकरणी त्यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.