आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना स्पर्धा परिक्षेचे मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:13 PM2019-07-23T14:13:37+5:302019-07-23T14:13:45+5:30
बुलडाणा: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करुन घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये दराने विद्या वेतनही देण्यात येते. प्रशिक्षणाकरीता अर्ज करण्यासाठी २६ जुलैपर्यंत मुदत देण्यता आली आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो. प्रशिक्षणाकरीता उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय १८ वर्षे पुर्ण केले असावे. तसेच त्याने किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तो सध्या कोणतेही शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत नसावा. या पात्रतेच्या उमेदवारांनी १ आॅगस्ट पासून सुरु होणाºया दुसºया सत्रासाठी २६ जुलै पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामध्ये अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एस. एस. सी. उत्तीर्णची गुणपत्रीका, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातंर्गत आॅनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास कार्यालयात नांव नोदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक आहे.
यापुर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ दिला जाणार नाही. इतर उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)