वीजपुरवठा वारंवार खंडित, पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:20+5:302021-08-12T04:39:20+5:30
साखरखेर्डा : गत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाणीपुरवठा करणारे पंप जळाले आहे. त्यामुळे गत १५ दिवसांपासून ...
साखरखेर्डा : गत काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाणीपुरवठा करणारे पंप जळाले आहे. त्यामुळे गत १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. सतत खंडित होणाऱ्या विजेमुळे पंप जळाल्याचा आरोप सरपंच यांनी केला आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
साखरखेर्डा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी महालक्ष्मी तलावाजवळ पाणीपुरवठा विहीर असून, या विहिरीतून दोन जलकुंभात पाणी साठविले जाते. त्यानंतर वॉर्डनिहाय पाणीपुरवठा केल्या जातो. महालक्ष्मी तलावाजवळील विहिरीवरील पाणीपुरवठा पंप निकामी झाल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. गेल्या वर्षभरापासून साखरखेर्डा गावात अनियमित वीजपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने कनिष्ठ अभियंता कुनाल डोळे यांना वेळोवेळी निवेदन दिले. परंतु वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यानंतर उपअभियंता खान यांनाही निवेदन दिले. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे १ लाख ५० हजारांचा पंप निकामी झाला आहे. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर साखरखेर्डा वीज वितरण उपकार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती
ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा १५ दिवसांपासून ठप्प असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देउन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हाेत आहे.
वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी विनंती केली आहे. जर सुधारणा झाली नाही तर पुढचे पाऊल टाकण्यात येईल.
दाऊत कुरेशी , सरपंच, साखरखेर्डा