देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 11:39 AM2021-05-17T11:39:49+5:302021-05-17T11:40:27+5:30
Buldhana News : ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची.
- विठ्ठल देशमुख
राहेरी : कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत. पण दोनदा कोरोना होऊन गेलेल्या व म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या पोलीस मित्रासाठी त्यांच्या ११३ क्रमांकाच्या बॅचमधील पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल ३० लाख रुपये जमा करून आपल्या सहकारी मित्राचा उत्तम उपचार करत त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची. मूळचे ते धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत; मात्र किनगाव राजा येथील पोलीस ठाण्यात ते कर्तव्यावर होते. या दरम्यान त्यांना मधल्या काळात कोरोनाचा दोनदा संसर्ग झाला. त्यातून ते बरेही झाले. पण दुर्मिळ अशा बुरशीजन्य आजारामुळे त्यांना ग्रासले होते. त्याच्या उपचारासाठी ते रुग्णालयात गेले असता तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च त्यांना येणार असल्याचे समजले तेव्हा त्यांचे अख्खे कुटुंब हादरले.
एवढ्या पैशाचा मेळ जमवायचा कसा असा प्रश्न त्यांना पडला. आणि त्यांच्या मदतीसाठी धावले ते त्यांच्या ११३ क्रमांकाच्या सिंहस्थ बॅचचे सर्व पोलीस अधिकारी. म्हणता म्हणता पैसे गोळा झाले आणि भाईदास माळी यांच्यावर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. आज त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मित्रांनी एकत्र येऊन आपल्या जिवलग मित्राला वाचविल्याचे हे एक अनोखे उदाहरण म्हणावे लागेल. २०१५-१६ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होण्यापूर्वी ज्या अभ्यासिकेत ते अभ्यास करायचे तेथील सहकाऱ्यांनीही त्यांना मदत केल्याचे त्यांचे बंधू दीपक माळी यांनी सांगितले.
दोनदा झालेल्या कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी म्युकरमायकोसिसचा त्रास होऊ लागला. नाक आणि तोंडाला मोठा त्रास होत होता. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र खर्चामुळे उपचाराच्या अडचणी समोर आल्या तेव्हा मित्रांनी मदत केली. त्यावेळी त्यांच्या बॅचचे पोलीस सहकारी मदतीसाठी धावून आले असे भाईदास माळी यांचे मित्र विजय गिते यांनी सांगितले. सहकारी मित्रांना याची माहिती मिळताच दोन ते तीन दिवसात ३० लाख रुपयांचा निधी गोळा झाला आणि उपचारही सुकर झाले.
बुलडाणा पोलिसांनीही केली मदत
बुलडाणा पोलीस दलातील सहकाऱ्यांनी सुमारे ९० हजार रुपयांची मदत आपल्या सहकाऱ्यासाठी केली. जिल्हा पोलीस अधीक्षकापासून ते पोलीस हेडकॉन्स्टेबल पर्यंतच्या सहकाऱ्यांनी ही मदत केल्याचे किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले. किनगाव राजा, राहेरी बुद्रुक, दुसरबीड, चांगेफळ, सोनोशी, वर्दडी, रुम्हणा येथील ग्रामस्थांनीही उपचारासाठी मदत केली आहे.
भाईदास माळी यांच्या इलाजासाठी तथा शस्त्रक्रियेसाठी जवळपास ३२ लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली आहे. आणखी २० दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागेल. त्यानंतर सुटी होईल. सुटी झाली तरी किमान तीन महिने त्यांना घरी आराम करावा लागणार आहे.
दीपक माळी, भाईदास माळी यांचे बंधू