पद्मावती चित्रपटावर बंदीसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:14 AM2017-11-07T01:14:38+5:302017-11-07T01:15:22+5:30
बुलडाणा: महाराणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून या चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: महाराणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून या चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
प्रारंभी गांधी भवन परिसरात राजपूत समाजबांधवांची सभा पार पडली. यावेळी महाराणी पद्मावती चित्रपटाच्या माध्यमातून महाराणी पद्मावती यांचा ज्वलंत इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित न करता त्याच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. चित्रपटाच्या माध्यमातून राजपूत समाजातील महिलांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न होत आहे, ते कदापि खपवून घेणार नाही, असे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष संध्या राजपूत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कुठल्याही चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली. राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वेळेप्रसंगी तुरुंगात जाण्याची आमची तयारी असल्याची संजय नाईक यांनी स्पष्ट केले. चित्रपट बंद पाडण्यासाठी राजपूत समाजासोबत असल्याचे जयश्री शेळके यांनी सांगितले. डॉ. प्रतापसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत, मुख्त्यारसिंग राजपूत, पृथ्वीराज राजपूत, ईश्वरसिंग चंदेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.