इंधन दरवाढीमुळे शेती मशागतीच्या दरात वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:31 AM2021-04-12T04:31:53+5:302021-04-12T04:31:53+5:30
ओमप्रकाश देवकर हिवरा आश्रम : गेल्या वर्षभरापासून अगोदरच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनता हैराण असताना आता पेट्रोल, डिझेल दरवाढीचा शेती ...
ओमप्रकाश देवकर
हिवरा आश्रम : गेल्या वर्षभरापासून अगोदरच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनता हैराण असताना आता पेट्रोल, डिझेल दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.
सध्या हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतात नांगरणी, वखरणी, पंजी, रोटाव्हेटर इत्यादी कामे करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने या वर्षी बळीराजाचे शेतीमशागतीचे गणित चांगलेच महागले आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेती मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देतात. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे या वर्षी नांगरणी, वखरणी या शेती मशागतीच्या कामासाठी अधिक दर मोजावे लागत आहेत. पूर्वी शेतकरी शेती मशागतीची कामे पशुधनाच्या मदतीने करत होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती मशागतीची कामे करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी नांगरणी, वखरणी, पेरणी इत्यादी कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्याला पसंती दर्शवितो. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसला तरी भाड्याच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची कामे केली जातात. मात्र काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फटका शेती क्षेत्राला बसला. इंधनाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षी अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर परतीच्या पावसामुळेसुद्धा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित डबघाईला आले आहे.
शेती मशागतीच्या दरात वाढ
यापूर्वी नांगरणीसाठी एका तासासाठी ५०० रुपये लागत होते. त्यासाठी आता ७०० रुपये मोजावे लागतात. रोटाव्हेटरला यापूर्वी ८०० रुपये लागत होते. मात्र इंधन दरवाढीमुळे रोटाव्हेटरसाठी १००० रुपये मोजावे लागतात. तर पंजीसाठी मागील वर्षी ५०० रुपये लागत होते, त्यासाठी आता ७०० रुपये लागत आहेत.
प्रतिक्रिया
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे शेती मशागत, नांगरणी, वखरणी, पंजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र शेतमालाच्या भावात त्या प्रमाणात वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
- अरुण गुलाबराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, दुधा