शेतरस्त्यांच्या खडीकरणासाठी निधी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:37 AM2021-03-09T04:37:23+5:302021-03-09T04:37:23+5:30
चिखली तालुक्यातील शेतरस्त्यांची व पांदण रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्यामधे पेरणीसाठी बी-बियाणे घेऊन जाण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी ...
चिखली तालुक्यातील शेतरस्त्यांची व पांदण रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्यामधे पेरणीसाठी बी-बियाणे घेऊन जाण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी शेतामध्ये बैलगाडी, ट्रॅक्टर शेतात जात नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी लोकसहभागातून शेतरस्त्यांची कामे केली आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यात २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ मध्ये भाग ब मधून पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत एकूण ३४ शेतरस्त्यांचे मातीकाम करण्यात आले आहे. आजही कृती आराखड्यातील रस्ते खडीकरण, मातीकाम करणे बाकी आहे. तहसीलकडे निधी पडून आहे. त्याचा वापर करून शेतरस्त्यांची कामे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीदरम्यान दिलेल्या आहेत. परंतु हा निधी अपुरा पडत असल्याने अनेक रस्त्यांची कामे रखडणार असल्याने पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत मातीकाम पूर्ण झालेल्या तालुक्यातील शेतरस्त्यांचा कृती आराखडा २०२०-२१मध्ये प्रपत्र अ मध्ये खडीकरणासाठी समावेश करण्यात यावा, रस्तांचे मातीकाम व मातीकाम झालेल्या रस्त्यांचे प्राधान्याने खडीकरण करण्यात यावे, शेतरस्त्यासाठी निधी अपुरा पडणार असल्याने तालुक्यातील शेतरस्त्यांसाठी मातीकाम, खडीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जि.प.बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व तहसिलदार यांच्याकडे केली आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानीचे नितीन राजपूत, कार्तिक खेडेकर, रविराज टाले, सुधाकर तायडे, गणेश थुट्टे, छोटू झगरे, दीपक धनवे, शेख बबलु यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.