बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशिवाय सर्व विभागांना निधीची चणचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:39 PM2020-11-18T12:39:27+5:302020-11-18T12:39:37+5:30
Buldhana ZP News विविध विभागासमोर योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे वार्षिक योजनेला कात्री लागल्याने ३३ टक्के निधीतून ५० टक्के निधी आरोग्यवर खर्च करण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेतंर्गतच्या विविध विभागासमोर योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सिंचन विभागाला निधीच उपलब्ध न झाल्याने चालू आर्थिक वर्षातील कामाचे नियोजनच होवू शकले नाही तर बांधकाम विभागाला ग्रामीण रस्त्यांसाठी पाच कोटींची गरज आहे. वार्षिक योजनेतंर्गतच आरोग्य विभागासाठी कोरोना संदर्भाने १६ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. एसडीआरएफअंतर्गतही चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातील काही निधी जि. प. आरोग्य आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यलयास देण्यात आला.
एसडीआरएफकडून ४ कोटी १७ लाखांचा निधी मिळाला
राज्य आपत्ती निवारण विभागाकडून बुलडाणा जिल्ह्याला आतापर्यंत चार कोटी १७ लाख १६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रामुख्याने तो कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी खर्च झाला आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तथा जिल्हा शल्यचिकित्सक कायार्लयास तो उपलब्ध करण्यात आलेला असल्याचे सुत्रांनी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले. केंद्राकडून अनुषंगीक निधी मिळाला नाही.