नातेवाइकांनी पाठ फिरवलेल्या कोरोना मृतांवर बुलडाण्यात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:26 AM2020-10-02T11:26:21+5:302020-10-02T11:26:42+5:30
Corna News Buldhana कोरोनामुळे मृत्यू झालेले व संदिग्ध मृतांसह तब्बल १६५ पार्थिवांवर बुलडाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व नातेवाइकांनी अंत्यसंस्कारासाठी पाठ फिरवलेल्या पार्थिवांवर बुलडाण्यातील दोन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेले व संदिग्ध मृतांसह तब्बल १६५ पार्थिवांवर बुलडाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यासाठी जवळपास दहा लाख २५ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बऱ्याच मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक पुढे आले नाहीत तर काही संदिग्धांचे पार्थिवही संबंधित गावात स्वीकारल्या गेले नाहीत. त्यामुळे अखेर प्रशासनाच्या सुचनेनुसार बुलडाण्यातील दोन्ही स्मशानभूमींमध्ये त्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. दुसरीकडे बुलडाणा पालिकेनेही मधल्या काळात अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची योजना कार्यान्वित केली होती. त्याचाही फायदा अशा पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यास झाला. ३० मार्चपासून आजपर्यंत बुलडाणा पालिकेंतर्गतच्या दोन्ही स्मशानभूमीमध्ये कोरोना व्यतिरिक्त मृत्यू पावलेल्या १६५ व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यापोटी आतापर्यंत तब्बल दहा लाख २५ हजार रुपयांचा खर्च आला आहे. यामध्ये कोरोनाबाधित व कोरोना संदिग्ध असलेल्या ५५ पार्थिवांचा समावेश आहे. प्रारंभीच्या काळात बुलडाण्यातील स्मशानभूमिमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासच विरोध झाला होता. त्यावरून अगदी पोलीस ठाण्यापर्यंत वाद पोहोचले होते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. आतापर्यंत डोणगाव येथील दोन, देऊळगाव घुबे, मलकापूर, धोत्रा भनगोजी, गुळभेली, मासरूळसह जिल्ह्यातील अनेक गावातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या पार्थिवाला विसावा देण्यात आला असल्याची माहिती अंत्यविधीसाठी लाकडे पुरविणाऱ्यांनी दिली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेकांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक पुढे आलेले नाहीत. त्यांच्या पार्थिवावर पालिकेने स्थानिकांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार केले. कोरोना मृतव अन्य आजाराने तथा वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्या जवळपास १६५ व्यक्तींच्या पार्थिवावर गेल्या सहा महिन्यात दहा लाख २५ हजारापर्यंत पालिकेचा खर्च झाला आहे.
- संजय गायकवाड, शिवसेना आमदार, बुलडाणा