वाकी खुर्द येथील सैनिकावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By संदीप वानखेडे | Published: July 23, 2023 05:36 PM2023-07-23T17:36:01+5:302023-07-23T17:36:12+5:30
वाकी येथील पंडित मच्छिंद्र हिवाळे हा २ जुलै, २०१३ रोजी सैन्य दलात भरती झाला होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते ३० दिवसांच्या सुट्टीवर होते.
धोत्रा नंदाई (बुलढाणा) : वाकी येथील सैनिक पंडित मच्छिंद्र हिवाळे यांचे २१ जुलै रोजी आजारामुळे पुणे येथे निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर २३ जुलै रोजी शासकीय इतमामात वाकी या गावी अंतिम संस्कार करण्यात आले. वाकी येथील पंडित मच्छिंद्र हिवाळे हा २ जुलै, २०१३ रोजी सैन्य दलात भरती झाला होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी ते ३० दिवसांच्या सुट्टीवर होते.
दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे दाखल करण्यात आले होते. नायक पंडित मच्छिंद्र हिवाळे पार्थिव आज सकाळी साडेसात वाजता पुण्यावरून देऊळगाव राजा तालुक्यात आणण्यात आले होते. पार्थिव देऊळगाव राजा व देऊळगाव मही येथे येताच, त्यांना श्रद्धांजली वाहनासाठी एकच गर्दी झाली होती. देऊळगाव राजा येथे माजी सैनिकाच्या वतीने नगरपालिकेसमोर त्यांना मानवंदना देण्यात आली. संपूर्ण गावात रांगोळी काढून त्यांचे पार्थिव सजावट केलेल्या वाहनांमध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर, शाेकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्यापश्चात आई, पत्नी, दोन मुली अन् बारा दिवसांचा मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, उपविभागीय महसूल अधिकारी समाधान गायकवाड, नायब तहसीलदार प्रीती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे, सैनिक कल्याण अधिकारी विष्णू उभारंडे, तलाठी संदीप वायाळ, उपसरपंच पिराजी नागरे, पोलिस पाटील जगन खिल्लारे, ग्रामपंचायत सदस्य प्रा.कमलेश खिल्लारे, आकाश वाकोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.