सिंदखेडवासीयांच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये गडकरींची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:19+5:302021-05-22T04:32:19+5:30
नवीन मोदे धामणगाव बढे : कोरोनाविरुद्धचा लढा एकत्रितपणे व सकारात्मकपणे लढा, असा सल्ला देत मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावातील विलगीकरण ...
नवीन मोदे
धामणगाव बढे : कोरोनाविरुद्धचा लढा एकत्रितपणे व सकारात्मकपणे लढा, असा सल्ला देत मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावातील विलगीकरण कक्षासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. त्यामध्ये दहा लिटरचा एक व पाच लिटरचे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा समावेश आहे.
कोरोनाला यशस्वीपणे थोपविण्यासाठी मागील एक वर्षात सिंदखेडवासीयांनी केलेल्या विविध उपाययोजनांसह पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकापर्यंत मजल मारली हाेती, तसेच जिल्हा स्मार्ट ग्राम, आरोग्य, रस्ते, वीज व वनराई या संदर्भात गावात झालेल्या विकासकामांची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांनी यावेळी गडकरी यांना दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिंदखेडवासीयांचे कौतुक करत भविष्यात सिंदखेड गावाला भेट देईल, असे आश्वासन प्रवीण कदम यांना दिले. यावेळी प्रवीण कदम यांच्यासमवेत सिंदखेडचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर माजी सरपंच दिलीप मोरे, कैलास गडाख उपस्थित होते.
नामदार गडकरी यांचे स्वीय सहाय्यक भेंडे यांनी सिंदखेड येथील विविध विकासकामांच्या उपक्रमाची माहिती विस्तृतपणे जाणून घेतली.
मागील वर्षी एप्रिल २०२० मध्ये सिंदखेड येथे लोकसहभागातून तसेच ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून गावकऱ्यांसाठी जिल्ह्यातील पहिले विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते. ते आजपर्यंत कार्यान्वित आहे. त्याचा फायदा सिंदखेडवासीयांना झाला असून, योग्यवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला यशस्वीपणे प्रतिबंध घालण्यात यश मिळाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेला संवाद अतिशय सकारात्मक असा होता. त्यामधून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे प्रवीण कदम यांनी सांगितले. तसेच सिंदखेड येथील विलगीकरण कक्षासाठी मिळालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना उपयोग होईल तसेच भविष्यातील कोरोनाचे भीषण संकट बघता सिंदखेड येथे गावकऱ्यांसाठी किमान दहा बेडचे कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रवीण कदम यांनी सांगितले.