‘अस्त्र, शस्त्र आणि फौज’बाबतचे वक्तव्य गायकवाडांनी घेतली मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:57+5:302021-07-09T04:22:57+5:30
खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्याला दोन समाजामधील वादाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे चितोडा ...
खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्याला दोन समाजामधील वादाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे चितोडा येथे तणावपूर्ण वातावरण मधल्या काळात निर्माण झाले होते. त्यावेळी संबंधित गावास भेट देऊन घटनेचे संदर्भ घेत आमदार संजय गायकवाड यांनी अस्त्र, शस्त्र आणि दहा हजारांची फौज आणू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हा वाद चिघळण्याची भीती होती. मात्र दुसरीकडे ग्रामस्थांनी अनुषांगिक प्रकरण साम्रज्याने घेऊन गावाच्या भल्यासाठी वाद मिटविण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण आपले उपरोक्त वक्तव्य मागे घेत असल्याचे आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. आपण भावनेच्या भरात ते वक्तव्य केले होते, असेही ते म्हणाले.
मात्र खोटे गुन्हे दाखल करून लोकांची आर्थिक पिळवणूक होत असले तर त्या विरोधात आपण आहोत. त्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आजही ठाम असल्याचे ते म्हणाले. मुळात चितोडा येथील वाद हा दोन कुटुंबामधील वाद होता. त्याला दोन समाजांतील वादाचे स्वरूप दिल्या गेले, असेही ते म्हणाले. आपण कोणत्या समाजाच्या विरोधात नसून अशा गुंडप्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. आपल्यावर आरोप करणाऱ्यांनी असे कृत्य करणाऱ्यांची पार्श्वभूमीही आधी तपासली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
--पोलिसांनी वेळीच भूमिका घेतली नाही--
या प्रकरणात पोलिसांनी वेळीच दखल घेऊन भूमिका घेतली असती तर येथील परिस्थिती चिघळली नसती. पोलिसांच्या स्थानिक कर्मचाऱ्यानेही वरिष्ठांना योग्य माहिती पुरवली नाही. त्यातून हे प्रकरण चिघळले. प्रारंभी खासदार प्रतापराव जाधव यांनी या प्रकरणात भूमिका घेतल्यानंतर आपण या ठिकाणी गेलो होतो. कुठल्या समाजाविरोधात आपली भूमिका नाही, असेही ते म्हणाले. पोलिसांकडे असलेल्या व्हिडिअेा रेकॉर्डिंगवरूनही काही बाबी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले.