श्रींच्या पालखीला रजतनगरीचा श्रध्देचा निरोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 08:02 AM2018-08-17T08:02:22+5:302018-08-17T08:16:00+5:30
दिंडी मार्गावर भाविकांची गर्दी, विदर्भ माऊली मार्गस्थ
योगेश फरपट/अनिल गवई
खामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (17 ऑगस्ट) खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माऊलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळली.
भगवान विठ्ठलाचे आषाढी एकादशीला दर्शन घेवून ही पालखी परतीच्या मार्गाला लागली. दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर श्रींची पालखी गुरुवारी सकाळी खामगावात पोहोचली. या ठिकाणी पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात आले. मुक्कामी असलेल्या पालखीतील वारकऱ्यांना श्रध्देचा निरोपही देण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ५ वाजता श्रींच्या पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वीच खामगाव आणि परिसरातील हजारो नागरिक, भाविक शेगावकडे निघाले होते. खामगाव आणि परिसरच नव्हे तर, नांदुरा, मलकापूर, चिखली, उंद्री, सिंदखेड राजा, बुलडाणा येथील भाविक खामगावात दाखल झाले. आपली वाहने खामगावात ठेवून, अनेक भाविकांनी दिंडी मार्गावरून माऊलींसोबत पायी वारी केली.
संत गजानन महाराजांची पालखी शेगावात पोहोचल्यानंतर या ठिकाणी असलेल्या उंच लोखंडी पुलावरून श्रींच्या पालखीसह वारकऱ्यांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
गर्दीचा उच्चांक!
श्रींची पालखी शेगावकडे मार्गस्थ झाल्यानंतर खामगाव येथून शेगावकडे जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारीही वाढत्या गर्दीच्या उच्चांकाचा प्रत्यय अनेक भाविकांना आला. गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत सारखी भर पडत असल्यामुळे दिंडी मार्गही अरुंद जाणवतो. परिणामी अनेक भाविकांना गर्दीचा त्रास होतो. पालखीसोबत चालत असताना, वाट काढणेही कठीण होवून जाते.
रस्त्यांमुळे अनेकांची वारी बिकट!
रस्ता रुंदीकरणाचा फटका श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांसह पायदळवारी करणाऱ्या भाविकांना बसला. श्रींच्या पालखीची जाणीव असतानाही कंत्राटदाराचा या ठिकाणी गलथानपणा दिसून आला. त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले. अनेकांच्या पायाला इजा पोहोचल्याचे चित्र संपूर्ण पालखी मार्गावर दिसून आले. याबाबीला कामाची संथगती कारणीभूत असल्याची चर्चा पालखी मार्गावर होती.