अमेरिकेतही झाला ‘गण गण गणात बोते’ चा गजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 03:34 PM2019-09-11T15:34:35+5:302019-09-11T15:36:00+5:30
शेगावीचे राणा संत गजानन महाराजांची पुण्यतिथी अर्थात ऋषीपंचमी अमेरिकेतही साजरी करण्यात आली
- गजानन कलोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगावीचे राणा संत गजानन महाराजांची पुण्यतिथी अर्थात ऋषीपंचमी अमेरिकेतही साजरी करण्यात आली. तिथे स्थायिक झालेल्या गजानन भक्तांनी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करीत संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले.
‘मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका’ असे संत गजानन महाराजांनी सांगितल्यानुसार श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ८ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री गजानन महाराज भक्त परिवार अमेरिकेतही श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करतो. या ग्रुपमधील श्री गजानन महाराजांचे भक्त महीन्यातुन एकदा एकत्र येऊन माऊलींची उपासना व नामजप करतात. ऋषीपंचमीलाही सकाळी ११:०० वाजता नामजप करण्यात आला. प्लेन्सबोरो, न्यू जर्सी, अमेरिका येथे आयोजित कार्यक्रमाला १२५ पेक्षा जास्त भाविकांनी हजेरी लावली.
पादुका पूजन, आरती, नामगजर, गजानन बावन्नी, गजानन चालीसा, गजानन अष्टक, भजन, गजानन महाराजांवर अनुभवकथन, सामूहिक प्रार्थना, नैवेद्य, महाआरती आदी कार्यक्रम घेण्यात आले. शेवटी सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)