गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल
By admin | Published: July 2, 2017 07:58 PM2017-07-02T19:58:24+5:302017-07-02T19:58:24+5:30
शेगाव : येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी पंढरपूर येथे दाखल झाली. मंगळवारी आषाढी यात्रेनिमित्त निघणाऱ्या पंढरपूर येथील मुख्य मिरवणुकीत शेगावच्या पालखीचा सहभाग राहणार आहे.
गजानन कलोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी पंढरपूर येथे दाखल झाली. मंगळवारी आषाढी यात्रेनिमित्त निघणाऱ्या पंढरपूर येथील मुख्य मिरवणुकीत शेगावच्या पालखीचा सहभाग राहणार आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ३१ मे रोजी श्रींच्या पालखीचे सकाळी ७ वा. प्रस्थान झाले होते. श्रींची पालखी २ जुलै १७ रोजी आषाढ शु.९ श्री क्षेत्र मंगळवेढा येथून २४ किमीचा प्रवास करीत सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपुरला पोहचली. ८ जुलै २०१७ पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे. पंढरपूर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात ही पालखी मुक्कामी असेल. या ठिकाणी आषाढी यात्रेनिमित्त श्री गजानन महाराजांच्या भक्तांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे वितरण अहोरात्र सुरु राहणार आहे. तसेच श्रींच्या भक्तांकरिता उत्तम व्यवस्था दरवर्षीप्रमाणे येथे ठेवण्यात आलेली आहे.
श्रींची पालखी ५०० च्या वर वारकऱ्यांसह एकूण ३३ दिवसांचा ५०० च्यावर किमीचा प्रवास करीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाली आहे. पालखी ९ जुलै १७ रोजी शेगाव करिता परतीचा प्रवास सुरु करणार आहे. ती ३० जुलै १७ रविवारला श्रावण शु.७ या दिवशी शेगावात दाखल होईल.
श्रींच्या पालखीचे आषाढी यात्रेचे ५० वे वर्ष
श्री संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाकरिता जात असते. या पायदळ वारीत भाविक मोठ्या श्रध्देने सामिल होतात. त्यांची उत्तम व्यवस्था गजानन महाराज संस्थानच्यावतीने केली जाते. या पालखीची शिस्त वाखाणण्याजोगी असते. यावर्षी पालखीचे पंढरपूर यात्रेचे ५० वे वर्ष आहे.
शेगावात आषाढी उत्सवाची जय्यत तयारी
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा मंदिरात पारंपारिक पध्दतीने आषाढी एकादशी उत्सव मंगळवार ४ जुलै रोजी भव्य प्रमाणात साजरा होत आहे. यानिमित्त दुपारी २ वाजता श्रींच्या रजत मुखवट्यासह श्री विठ्ठल यांचे तैलचित्रांची मिरवणूक रथ, गज, अश्व पताकाधारी व टाळकरी यांच्यासह नगरपरिक्रमेसाठी निघणार आहे. संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी परत आल्यानंतर महाआरती होणार आहे.
उत्सवाची वैशिष्ट्ये
- उत्सवकाळात चोख पोलिस बंदोबस्त
- श्रींच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी नियोजनबध्द व्यवस्था
- आषाढी यात्रेनिमित्त फराळी महाप्रसाद
- श्रींच्या रजत मुखवट्यासह श्री विठ्ठलाच्या तैलचित्रासह नगर परिक्रमा
- विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
- नगर परिक्रमा मार्ग आजही अर्धवट
- भक्तांच्या सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पूर्णत्वास