नांदुरा तालुक्यात २५० ठिकाणी चालतो जुगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:12 PM2020-01-20T15:12:01+5:302020-01-20T15:12:10+5:30
काही भागात पोलीसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवैध धंद्यावाल्यांनी कोणाचेही न ऐकता पुन्हा हा व्यवसाय सुरु केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून सुमारे २५० ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती आहे.
एकट्या नांदुरा शहरात सध्या सुमारे १०० पेक्षा जास्त ठिकाणी जुगार सुरू आहे. काही भागात पोलीसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवैध धंद्यावाल्यांनी कोणाचेही न ऐकता पुन्हा हा व्यवसाय सुरु केला आहे.
नांदुरा तालुक्यात प्रत्येक खेड्यात दोन ते चार ठिकाणी जुगार सुरू आहे. निमगाव, वडनेर, चांदुर-बिस्वा गावांमध्ये १० ते १५ वरलीची दुकाने असून अशी एकुण ग्रामीण भागात १५० च्या वर अवैध व्यवसाय करणारे असल्याने तालुक्यात सुमारे २५० ठिकाणी जुगार सुरू असल्याचे कळते.
अवैध धंद्यांविरोधात पोलीस कारवाई करतात, मात्र काही काळानंतर पुन्हा परिस्थिती जैसेथे होते. अवैध धंद्याविरोधात स्थानीक पोलीस प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक, एल.सी.बी. बुलडाणा व जिल्हा पोलीस प्रमुखांचे पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते, परंतु शहरातील अवैध धंदे बंद होत नसल्याचे दिसून येते. चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे अवैध धंदे बंद होतातही, मात्र व्यवसाय करणारे ठिकाण बदलून दुसरीकडे बस्तान बसवित असल्याचे दिसून येते.
गत काही दिवसांपासून अवैध धंद्यांच्या बाबतीत जिल्ह्यात नांदुरा शहराचे नाव मोठ्या प्रमाणावर गाजत असल्याचे दिसून येते.
जळगाव जामोदशी धागे-दोरे!
नांदुर येथे ‘अचल’ नावाने सुरू असलेला जुगार सध्या मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. ही वरली जळगाव जामोद येथे काढल्या जात असल्याचे समोर येत आहे. गत काही दिवसांपुर्वी नांदुरा शहरात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या पथकामार्फत मोठी कारवाई करण्यात आली होती. परंतु आता नांदुरा येथील वरलीचे कनेक्शन जळगाव जामोद येथे असल्याचे दिसून येत असल्याने पोलीसांना तिकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
नांदुरा शहर व तालुक्यातील जुगारांवर कारवाई सुरु आहे. नागरीकांनीही याबाबत जागृत राहुन ठिकाणासह जुगाराची माहीती दिल्यास माझे पथक तेथे छापा मारून कारवाई करेल.
- प्रीया ढाकणे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर.