फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:51 PM2018-01-30T13:51:58+5:302018-01-30T13:54:18+5:30
खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले.
खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान करतांना ते बोलत होते.
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने येथील स्व. विलासराव देशमुख कॉटन मार्केट यार्डमधील मनोबल अभ्यासिकेत आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. गांधी हत्या समज अपसमज हा व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार योगेश फरपट तर नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश माने, लक्ष्मीनारायण फाउंडेशनचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव हटकर, ज्येष्ठ नेते समाधान पाटील, भारिप नेते अनिल क्षिरसागर,शेकापचे वासुदेवराव उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधींची हत्या का करण्यात आली याचा उहापोह करतांना सौरभ हटकर पुढे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या ही कर्मठवाद्यांनी घडवून आलेला कट आहे. गांधींवर सोईनुसार आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचाच प्रयत्न नेहमी झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला. १९४८ साली महात्मा गांधी काही कारणास्तव नोबेल पारितोषीक मिळू शकले नाही त्याची भर संयुक्त भारताच्या प्रतिनीधींना म्हणजेच कैलास सत्यार्थी व युसूफ मलाला या नोबेल पारितोषीक देवून झाली असावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तत्पुर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण धुरंधर यांनी केले. कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यासोबत कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी, लक्ष्मीनारायण मॉडेल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.