Ganesh Festival: ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:31 PM2018-09-12T12:31:24+5:302018-09-12T12:32:42+5:30
खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंडप व आरास सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व्यस्त आहेत. तर घरगुती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणाºया पूजा साहित्यासह पुरोहितांची वेळ ठरवण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसत आहे.
बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणाºया साहित्यासह आरतीसाठी आवश्यक टाळ, आरतीची पुस्तके, ढोल अशा विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. खामगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गणेशमूर्तीसोबतच पूजासाहित्याचीही दुकाने आहेत. सोबतच शहरातील इतरही रस्त्यांवर तसेच मुख्य चौकात गणेशमूर्ती आणि पूजा साहित्याची दुकाने थाटली आहेत. पूजेसाठी आवश्यक कापूर, अगरबत्ती, निरांजन, ताम्हणपात्र, कलश, चौरंग अशा वस्तूंना अधिक मागणी होत आहे.
गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त!
घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. गुरूवारी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. या वेळेत गणेशपूजन करणे अशक्य असल्यास, पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करावे, असे ज्योतिष्यांचा सल्ला आहे.
पर्यावरण पूरक साहित्याची रेलचेल!
प्लास्टिकबंदीमुळे यावर्षी पहिल्यादांच गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याची मागणी वाढली आहे. या साहित्याची भाविकांकडून खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. पर्यावरण पूरक सजावट साहित्यासोबतच माती आणि शाडू मातीच्या गणेशमूर्तींनाही मोठी मागणी असल्याचे दिसून येते.