गुरे चोरणारी टोळी गजाआड; रोख दोन लाख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:13 PM2019-08-20T18:13:35+5:302019-08-20T18:15:25+5:30
विशेष स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या एका विशेष मोहिमेतंर्गत अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथून आठ आरोपींना अटक केली आहे.
बुलडाणा: मराठवाड्याच्या सिमावर्ती भागा लगतच असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्यामधून शेतकºयाचे पशुधन मोठ्या प्रमाणावर चोरी होण्याचे प्रमाण पाहता विशेष स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या एका विशेष मोहिमेतंर्गत अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथून आठ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून दोन लाख रुपये रोख, चोरी केलेली शेती अवजारे आणि गुरे कापण्याची हत्यारेही जप्त करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, चिखली, जानेफळ, डोणगाव आणि रायपूर पोलिस ठाण्यातंर्गतच्या हद्दीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुरे चोरल्याचे पोलिसांच्या तापासात समोर आले आहे. दरम्यान या पाच पोलिस ठाण्यातच त्यांच्या विरोधात तब्बल १२ गुन्हे दाखल असून त्यातील सात गुन्हे हे एकट्या मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या भागातून ४२ गुरे त्यांनी चोरली असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. दरम्यान, या चोरांच्या अटकेमुळे आंतरजिल्हा पातळीवर गुरे चोरी करणाºया एखाद्या मोठ्या टोळीचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या एक तपापासून बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुरे चोरीस जाण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढलेले आहे. बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर या मराठवाड्या लगतच्या तालुक्यातून प्रामुख्याने गुरे चोरी जात असल्याचे आतापर्यंतच्या नोंदीवरून स्पष्ट होते. बैलांसह अन्य गुरे चोरी होण्याचे हे प्रमाण होते. गुरे चोरीच्या या वाढत्या घटना पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या चोºयांचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुषगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुधाकर काळे, सय्यद हारूण, विलास काकड, दीपक पवार, सुनील खरात, संजय नागवे, विजय सोनुने, राहूल बोर्डे यांचे एक पथक तयार केले होते. या पथकाने पाच पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हे चोरीच्या गुन्ह्याची सविस्तर माहिती घेत तपास केला. सोबतच अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातून आठ जणांना अटक केली आहे.
आरोपी महान येथील
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अलिम शेख मेहमुद (३३), शेख नाजीम शेख महेमुद (३५), सय्यद अबरार सय्यद अनसार (३१), अब्दुल रसूल अब्दुल रशीद (२७), शेख इम्रान शेख मेहमुद, कल्लू उर्फ कालू शेख, साजीद खान अफसर खान (सर्व रा. महान) आणि जॉनी (रा. बार्शिटाकळी) अशी आरोपींची नावे आहेत. चौकशीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातून गुरे चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख रुपये रोख, चोरीस गेलेली शेतातील अवजारे व गुरे कापण्याची हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहे.