रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या ६ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
By निलेश जोशी | Published: August 17, 2023 07:47 PM2023-08-17T19:47:51+5:302023-08-17T19:48:11+5:30
दोन बोटींसह ४३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
देऊळगाव राजा: तालुक्यातील संत चोखामेळा सागरात अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या सहा रेती तस्करांच्या मुसख्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या असून दोन बोटींसह संबंधितांकडून तब्बल ४३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात रेतीचा अवैध उपसा तथा विक्री करणाऱ्या तस्करांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संत चोखामेळा सागराच्या सुलतानपूर शिवारात छापा टाकून रेतीचा अवैधरित्या उपसा करणाऱ्या विवेक शिवाजी वायाळ (रा. चिंचखेड), गजानन एकनाथ देशमुख (दांडगे) (रा. मंडगाव) व अन्य चार व्यक्तींना पकडण्यात आले.
या जलाशयातून विना परवाना ते रेतीचा उपसा करतांना मिळून आले. छाप्या दरम्यान घटनास्थळावरून १४ ब्रास रेतीसह रेती चोरी करीता वापरण्यात आलेल्या दोन बोटी, दोन इंजीन, गॅस सिलेंडर, लोखंडी सेक्शन पाईप व इतर साहित्य असा ४३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कण्यात आला आहे. प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासन निर्देशानुसार महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हस्तगत करण्यात आलेल्या दोन्ही बोटीही घटनास्थळावरच नष्ट करण्यात आल्या आहेत. गुन्ह्यात फरार असलेल्या काही आरोपींचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.ही कारवाी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन काकडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजकुमार राजपूत, अरूण हेलोडे, राजेंद्र अंभोरे, श्याम सिरसाट, गजानन दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.