जिल्ह्यात गुंजला हरित महाराष्ट्राचा गजर!
By admin | Published: July 2, 2017 09:10 AM2017-07-02T09:10:57+5:302017-07-02T09:10:57+5:30
बुलडाणा जिल्हाधिका-यांनी केले वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य शासनाने हरित महाराष्ट्राच्या पायाभरणीसाठी महत्त्वाकांक्षी चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. यावर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ७ जुलैपर्यंत सप्ताहाभर चालणार आहे. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्ह्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, खासगी व्यवस्थापनांची कार्यालये, खुली जागा, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, आयटीआय, वन विभागांचे आगार आदी ठिकाणी प्रामुख्याने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहिमेला जिल्ह्यामध्ये लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण केले. त्यानंतर खामगाव रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षारोपण केलेल्या साईटजवळ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, उपवनसंरक्षक बी. टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक पी. के बागूल आदींसह वन व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तहसील कार्यालय, उपनिबंधक कार्यालय आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण केले म्हणजे संपले, असे नाही, तर या रोपट्यांचे वृक्षात रूपांतर कसे होईल, याची काळजी घेतली पाहिजे. वृक्ष जगविण्यास येणाऱ्या अडचणींवर मात करून भावी पिढीसाठी वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी वृक्षारोपणाप्रसंगी केले. शाळा-शाळांमधून याआधीच वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.
जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, विविध विभागांची तालुका कार्यालये, पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालये, नगरपालिका आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार सर्वांनी हिरीरीने सहभाग घेतला.