संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:40 AM2021-09-04T04:40:56+5:302021-09-04T04:40:56+5:30
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहत असताना प्रत्येकाशी संवाद होणेही गरजेचे आहे. तेव्हाच भाव-भावनांची देवाण-घेवाण होऊन मानसिक स्वास्थ्य ...
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहत असताना प्रत्येकाशी संवाद होणेही गरजेचे आहे. तेव्हाच भाव-भावनांची देवाण-घेवाण होऊन मानसिक स्वास्थ्य अबाधित राहते. मात्र, कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण घरातच होते. तेव्हा समाजाशी असलेला संवाद काहीसा हरपला होता. तर याच दरम्यान अनेकांचे रोजगारही गेले होते. तर पती-पत्नी सतत घरातच असल्याने गृहकलहही वाढले होते. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाल्याने अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागला. मात्र, हे सर्व असताना जर केवळ आणि केवळ तुम्ही जवळच्या व्यक्तीजवळ बोलून तणावाचा निचरा केल्यास तुमचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहू शकते असाही सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देतात.
असे करा तणावाचे नियोजन
मानसिक ताणाचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला यूस्ट्रेस असून, याला आवश्यक ताण असे म्हणतात. हा ताण प्रत्येकाला असतो यामुळे व्यक्ती स्वत:ची प्रगती करू शकतो. यानंतर येतो तो डिस्ट्रेस. याला अनावश्यक ताण असे म्हणतात. या तणावाचे वेळीच नियोजन न केल्यास त्याचे डिसऑर्डरमध्ये रुपांतर होते. म्हणजे तो व्यक्ती मानसिक रुग्ण होतो. तेव्हा डिस्ट्रेस कमी करण्यासाठी जवळच्या व्यक्तीजवळ बोलून मोकळे व्हा असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.
मानसिक स्वास्थ्य राखणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. अती विचार करणे, भीती वाटणे, शांत बसावेसे वाटणे ही लक्षणे दिसताच मित्रांसोबत गप्पा मारा, आवडत्या विषयात रममाण होण्याचा प्रयत्न करा, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून तणावाचा निचरा करा.
-डॉ. विश्वास खर्चे, मानसोपचार तज्ज्ञ, बुलडाणा.