गॅस दरवाढीचा स्फोट: आठ महिन्यात ३१८ रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:43 PM2018-11-18T17:43:18+5:302018-11-18T17:50:42+5:30
बुलडाणा: पेट्रोल, डिझेल दरवाढीपाठोपाठ गॅसच्या महागाईचाही वारंवार स्फोट होत आहे. गेल्या सात महिन्यात सिलेंडरच्या दरामध्ये ३१८.५० रुपयांची वाढ झाली असून सध्या एका घरघुती सिलेंडरचे दर ९६१ रुपयांवर पोहचले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: पेट्रोल, डिझेल दरवाढीपाठोपाठ गॅसच्या महागाईचाही वारंवार स्फोट होत आहे. गेल्या सात महिन्यात सिलेंडरच्या दरामध्ये ३१८.५० रुपयांची वाढ झाली असून सध्या एका घरघुती सिलेंडरचे दर ९६१ रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप करूनही गॅसच्या दरवाढीमुळे चुलीचा धूर कायमच आहे. चुल आणि धूर मुक्तीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी चुल आणि सरपण वापरले जाते. त्यामुळे प्रदुषण वाढत असून महिलांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढते. चुलीच्या वापरामुळे होणारे हे प्रदुषण रोखण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. गोरगरीबांच्या घरात चुलीच्या ऐवजी गॅस कनेक्शन असावे, यासाठी घरोघरी प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप करण्यात आले आहेत. गरजु महिला व कुठलेही कुटुंब गॅस कनेक्शनपासून वंचीत राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून अर्ज घेऊन तातडीने त्यांना गॅस कनेक्शनचे वाटप केले. ग्रामीण भागात या योजनेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुद्धा करण्यात आली. सर्व पात्र लाभार्थ्यांना गॅस वाटप केल्यानंतरही अनेक ठिकाणी चुल आणि सरपण वापरण्यात येत असल्याचे दिसून येते. गॅसचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने गॅस वापरणे परवडत नसल्याची ओरड गॅस कनेक्शन लाभार्थ्यांमधून होत आहे. एप्रिल २०१८ पासून प्रत्येक महिन्यात गॅसची दरवाढ झाली आहे. सध्या १४.२ किलोच्या सिलींडरची किंमत ९६१ रुपयांवर गेली आहे. तर पाच किलो सिलींडरची किंमत ५०१ रुपये आहे. १९ किलोच्या व्यावसायीक सिलींडरची किंमत १ हजार ५९९ रुपये, ४७ किलोच्या सिलींडरची किंमत ३ हजार ९९५ रुपये झाली आहे. एप्रिलपासून आतापर्यंत घरघुती सिलींडरची दरवाढ ३१८.५० रुपयाने झाल्याने गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.
महिन्याकाठी ४१ रुपयांची वाढ
एप्रिल पासून नोव्हेंबरपर्यंत घरघुती गॅस सिलींडरसाठी २८९ रुपयांची दरवाढ झालेली आहे. त्यानुसार महिन्याकाठी ४१.३५ रुपयांची वाढ असल्याचे दिसून येते. सिलींडरच्या दरवाढीचा आलेख वाढतच असल्याने सर्वसामान्यांना सिलींडर भरून आणने अवघड झाले आहे. त्यामुळे महिला पुन्हा चुल आणि लाकडी सरपणाकडे वळत आहेत.
अशी झाली दरवाढ
घरघुती सिलींडरची किंमत एप्रिलमध्ये ६४४.५० रुपये होते. त्यानंतर मे मध्ये ६४२.५० रुपये, जूनमध्ये ६१९ रुपये, जुलैमध्ये ७४८.५० रुपये, आॅगस्टमध्ये ७८४ रुपये, सप्टेंबरमध्ये ८१४.५० रुपये, आॅक्टोबरमध्ये ८७१.५० आणि नोव्हेंबरमध्ये ९६१ रुपये झाली. एका सिलींडरमागे प्रत्येक महिन्याला वाढलेल्या दरामुळे गरीब कुटुंबाना आर्थिक फटका बसत आहे.
सिलींडर भरण्यासाठी अर्थिक कोंडी
प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत गोरगरीब कुटुंबाच्या घरातील स्वयंपाक गॅसवर सुरू झाला. मात्र हे सिलींडर भरून आणण्यासाठी या कुटुंबाची आर्थिक स्थिती नसल्याने उज्वला योजनेतुन मिळलेले सिलींडर एकदाच्या वापरानंतर घरात बंद पडून राहत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे गोरगरीब कुटुंबाना सिलींडरसाठी ९६१ रुपये मोजणे अवघड झाले आहे. त्यामुळे सिलींडर भरण्यासाठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.