गॅसची सबसिडी आली तीन रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 03:35 PM2021-02-06T15:35:52+5:302021-02-06T15:36:14+5:30
Gas subsidy News गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला गॅसमागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅसच्या किमतीने सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे ग्राहकांच्या खात्यात दिली जाणारी सबसिडी दोनशे ते तीनशे रुपयांवरून थेट घसरत अवघ्या तीन रुपयांवर आल्याने शासनाने सर्वसामान्यांची थट्टा केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने चोरपावलांनी कधी गॅसची सबसिडी संपविली, याबाबत नागरिक आता चर्चा करू लागले आहेत.
दोन वर्षांपूर्वी १४ किलो वजनाच्या गॅसला पाचशे ते सहाशे रुपये दर आकारला जात असे. यात प्रत्येक तारखेस कमी-अधिक किंमत आकारली जात असे. दुसरीकडे या गॅसची ग्राहकास सबसीडी अनुदान ग्राहकांच्या खात्यात दोनशे ते तीनशे रुपये जमा केले जाते असे. नोव्हेंबर २०२० मध्ये १४ किलोच्या सिलिंडरची किंमत ६०३ रुपये होती.
एक डिसेंबरला ६०३ रुपये, दोन तारखेला ६५३, तर १४ तारखेला ७०३ अशी एकाच महिन्यात तीन वेळा दरवाढ झाल्याने हा गॅस भाववाढीचा उच्चांक आहे. गुरुवारी रात्री पुन्हा २०-२५ रुपयांची वाढ झाल्याने आता गॅसचा दर ७२३ रुपये असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
ग्राहक आले जेरीस; सामान्यांच्या खिशाला झळ!
गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला गॅसमागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते.
त्यामुळे सहाशे रुपयांचा गॅस हा ग्राहकांना चारशे ते साडेचारशे रुपयांना मिळत असल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा होता.
परंतु डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात तीनदा गॅसचे दर वाढले आहेत, तर गुरुवारीदेखील वीस रुपयांची वाढ झाल्याने गॅसचे दर साडेसातशे रुपयांवर गेले.
n परंतु, ग्राहकांना दिले जाणारे अनदान केवळ तीन रुपये दिले जात असल्याने यात थट्टा मांडली जात आहे. भाववाढीच्या तुलनेत सबसिडीत वाढ करण्याऐवजी घट झाल्याने सर्वसामान्य जेरीस आले आहेत.