सामान्य रुग्णालयास वर्ग-१ चे अधिकारी मिळेना!
By admin | Published: May 22, 2017 12:33 AM2017-05-22T00:33:38+5:302017-05-22T00:33:38+5:30
डॉक्टरांची १६ पैकी १३ पदे रिक्त : अपुऱ्या संख्येमुळे डॉक्टर व परिचारिकांवर कामाचा बोजा
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील सामान्य रुग्णालयात वर्ग- १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६ पदे मंजूर असताना फक्त तीन पदे भरलेली आहेत, तर तब्बल १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक भौतिक सुविधा उपलब्ध असतानाही केवळ तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना त्याचा लाभ घेता येत नसल्याचे दिसून येते.
येथील सामान्य रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असून, येथे खामगाव तालुक्यासह नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून विविध भौतिक सुविधांची उपलब्धता याठिकाणी करुन दिली. परंतु आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टरच नसल्याने या सुविधा कुचकामी ठरत आहेत. या रुग्णालयात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (भिषक), वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया), अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, शरीर विकृती चिकित्सक, मनोविकृती चिकित्सक, चर्मरोग तज्ज्ञ, क्षयरोग तज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, नाक, कान, घसा तज्ज्ञ, दंत शल्य चिकित्सक, अशी एकू ण १६ पदे मंजूर आहेत. यापैकी वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ अशी फक्त तीन पदे सध्या भरलेली असून, उर्वरित १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होत असून, रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मात्र २४ मंजूर असून, यापैकी २३ भरलेली आहेत. परंतु विविध विषयांचे तज्ज्ञ नसल्याने सामान्य रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च होऊनही त्याचा पाहिजे त्या प्रमाणात रुग्णांना लाभ मिळत नसल्याचे दिसून येते.
डॉक्टरांवर येतो क ामाचा ताण
रुग्णालयात डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. बरेचदा डॉक्टरांना डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे डॉक्टरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येतो. काही दिवसांपूर्वी डॉक्टर चक्कर येऊन पडल्याची घटना सामान्य रुग्णालयात घडली होती. त्यामुळे डॉक्टरांना कामाचा ताण असह्य होत असून, रिक्त पदे भरण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे.
परिचारिकांचीही अपुरी संख्या
सामान्य रुग्णालयात परिचारिकांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. एकूण ८५ पदे मंजूर असताना सद्यस्थितीत ५८ पदे भरलेली असून, २७ पदे रिक्त आहेत. यामध्ये अधिपरिचारिकांची (स्टाफ नर्स) ६४ पदे मंजूर असताना ५२ कार्यरत आहेत. अधिसेविका व सहायक अधिसेविकेचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, ती दोन्ही रिक्त आहेत. बालरोगपरिचारिकांची दोन पदे मंजूर असून, ती सुध्दा रिक्त आहेत.मनोविकृत परिचारिकेचे एक पद रिक्त आहे. परिसेविकेची १५ पदे मंजूर असताना १० पदे रिक्त आहेत, अशी एकंदरित २७ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा मोठा बोजा असल्याचे दिसून येते.
शासकीय सेवेस डॉक्टर अनुत्सुक
सामान्य रुग्णालय किंवा अन्य कोणत्याही शासकीय दवाखान्यात सेवा देण्याबाबत डॉक्टर अनुत्सुक दिसून येतात. खासगी प्रॅक्टीसमध्ये वैध-अवैध मार्गाने गडगंज कमाई होत असल्याने शासकीय सेवेमध्ये राहून लिमिटेड इन्कमवर रात्रंदिवस काम करणे जीवावर येते. सेवाभाव दुर्मीळ झाल्यामुळेच सर्व प्रकारच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या जागा रिक्त असून, त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य सेवेवर होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही.
वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असली तरी वर्ग २ ची बहुतांश पदे भरलेली आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयाची आरोग्यसेवा सुरळीतपणे सुरु आहे. मात्र कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येतो हे खरे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पदे भरण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वर्ग २ च्या काही डॉक्टरांना पदोन्नती देऊन पदे भरली जाऊ शकतात.
-डॉ.एस.बी. वानखडे
वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय, खामगाव