सामान्य रुग्णालयाला रिक्त पदांचा आजार
By admin | Published: October 29, 2014 10:38 PM2014-10-29T22:38:26+5:302014-10-29T23:50:55+5:30
खामगाव सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिका-यांची १९ पदे रिक्त.
खामगाव : घाटाखाली जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्या खामगाव येथील सामान्य रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांसोबत इतर कर्मचार्यांची रिक्त पदे वाढत असल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. सामान्य रुग्णालयालाच रिक्त पदाचा आजार असल्याचे दिसून येत आहे.
खामगाव येथील सामान्य रुग्णालय २२0 खाटांचे आहे. दररोज येथील बाह्य रुग्ण विभागात ४00 पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांच्या सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ ची १६ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी पाच डॉक्टर सध्या कार्यरत आहेत, तर शल्यचिकीत्सक हे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. वैद्यकीय अधीक्षक, बालरोगतज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ असे चार डॉक्टर कामकाज पाहत आहेत, तर वर्ग दोनची २0 पदे मंजूर असून, आठ पदे रिक्त आहेत. १२ डॉक्टर कार्यरत असले तरी यापैकी एक डॉक्टर मागील फेब्रुवारीपासून गैरहजर आहेत, तर दुसरे डॉक्टर उच्चशिक्षणासाठी गेले आहेत. परिणामी १0 डॉक्टर कार्यरत आहेत. वर्ग तीनची १३१ पदे मंजूर असताना १0९ कार्यरत असून, २२ पदे रिक्त आहेत. वर्ग चारची ५७ पदे मंजूर असून, यापैकी नऊ पदे रिक्त असल्याने ४८ कर्मचारी कामकाज करीत आहेत. येथील सामान्य रूग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू), नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एसएनसीयू), डायलिसीस युनिट, जळीत कक्ष कार्यान्वित आहे. २४ तास अपघात कक्ष (ट्रामा केअर युनिट) येथे आहे. प्रसूतीसाठी येणार्या स्त्री रुग्णांची संख्या वाढती आहे. मात्र, याकरिता केवळ एकच स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. स्त्रीरुग्णांची वाढती संख्या पाहता सोनोग्राफी मशीन कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मात्र, मागील कित्येक महिन्यापासून सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत धूळखात पडलेली आहे.